भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. धडाकेबाज खेळी करणारा रोहित शर्मा ८५ धावांवर माघारी परतला. मोठा फटका खेळताना तो सीमारेषेवर बाद झाला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. त्याचसोबत त्याने विक्रमांचा चौकार लगावला.

१. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये २ हजार ५०० धावांचा टप्पा गाठला. टी २० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर रोहितच्या २ हजार ५३७ धावा आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही भारतीय फलंदाजच आहे. विराटच्या टी २० मध्ये २,४५० धावा केल्या.

२. रोहितने दुसऱ्या सामन्यात ६ षटकार लगावले. त्यासोबतच त्याचे बांगलादेशविरूद्ध टी २० मध्ये १९ षटकार झाले. बांगलादेशविरूद्ध सर्वाधिक टी २० षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला. तसेच, कर्णधार म्हणून त्याने ३५ षटकार लगावले. त्यासोबत त्याने महेंद्रसिंग धोनीचा ३४ षटकारांचा विक्रम मोडला.

३. एका सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने दुसरा क्रमांक पटकावला. रोहितने असा पराक्रम ८ वेळा केला आहे. या यादीत ख्रिस गेल आणि कॉलिन मुनरो हे दोघे ९ वेळा असा पराक्रम करून संयुक्त अव्वल स्थानी आहेत.

४. एका वर्षात २ हजार धावांचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. विरेंद्र सेहवागने २००८ साली एका वर्षात २ हजार धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर रोहितने या वर्षी ही कामगिरी केली.