बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. मोहम्मद शमीचे चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या बळावर भारताला दणदणीत विजय मिळवणे शक्य झाले. मयांक अग्रवाल याने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला. द्विशतक ठोकणाऱ्या मयांक अग्रवालला सामनावीर जाहीर करण्यात आले.

Video : “भावा… तू २०० कर!”; विराटच्या मेसेजला मयंकने दिलं ‘हे’ उत्तर

“जेव्हा तुम्हाला कोणीतरी प्रेरणा देते; चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देते, तेव्हा खेळायला अधिक मजा येऊ लागते. आत्मविश्वास वाढतो. विराट नेहमीच मला प्रोत्साहन देतो. मी पहिल्यांदा १५० धावांचा टप्पा गाठला होता, तेव्हा माझ्यासोबत विराट नॉन-स्ट्रायकर एन्डला होता. ‘१५० म्हणजे २०० च्या अगदी जवळ असते.. आता पुढचा टप्पा थेट २०० चा आहे’ असे विराटने मला सांगितले होते. या वेळीदेखील त्याने मला ड्रेसिंग रूममधून इशारा दिला आणि मी देखील द्विशतक करू शकलो”, असे मयांक अग्रवालने सामन्यानंतर सांगितले.

“माझी ही लय दीर्घ काळ अशीच राहू दे अशी माझी इच्छा आहे. मी षटकार लगावण्याचा कायम सराव करत असतो. कसोटीसाठी सराव करताना मी तसा सराव करत नाही. पण स्थानिक स्पर्धांमध्ये मी काही वेळा मोठे फटके खेळतो. षटकार खेचतो. टीम इंडियासाठी खेळणे हे तर स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. त्यातच मला टीम इंडियासाठी कारकिर्दीची जी सुरुवात मिळाली त्यासाठी मी सगळ्यांचाच आभारी आहे. हीच लय, हाच फॉर्म कायम रहावी अशी मला आशा आहे”, असेही तो म्हणाला.

हे वाचा – Video : ‘या’ फटक्याने केला मयांकचा घात

भारताकडून सलामीवीर मयांक अग्रवालने सर्वाधिक २४३ धावा ठोकल्या.