भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. त्यानंतर भारताच्या डावात कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार खेळी करत आहे. त्यामुळे बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर माघारी परतला.

भारताचे पहिले ३ गडी अबु जायदने बाद केले. पुजारा अर्धशतक झाल्यावर बाद झाला. त्यानंतर कोहली मैदानात उतरला. तो मोठी खेळी करेल असे वाटतानाच अबु जायद याने त्याला पायचीत पकडले. पंचांनी त्याला बाद ठरवले नाही, पण रिव्ह्यूमध्ये मात्र कोहलीला बाद ठरवण्यात आला.

दरम्यान त्याआधी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. पण चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार खेळी केली. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. पुजारा ५४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कोहलीही माघारी परतला.

त्याआधी, शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.