भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आश्वासक सुरुवात केली. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने या मालिकेत नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाला अर्धशतकी भागीदारी करुन दिल्यानंतर मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडगोळी माघारी परतली.

यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. विराटने यादरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. या खेळीदरम्यान विराटने माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या कामगिरीशी बरोबरी केली.

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे सामन्यांत विराटचं हे १३ वं अर्धशतक ठरलं. मात्र आपल्या अर्धशतकाचं मोठ्या खेळीत रुपांतर करणं विराटला जमलं नाही. इश सोधीने ५१ धावांवर विराट कोहलीचा त्रिफळा उडवला.