तिसऱ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये नूझीलंडचा पराभव करणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. पाच सामन्याची टी २० मालिका आधीच ३-०ने जिंकल्यामुळे आज, शुक्रावारी होणाऱ्या चौथ्या सामन्यात भारतीय संघ प्रयोग करण्याची शक्यता आहे. फलंदाजीमध्ये प्रयोग होण्याची शक्यता नाही. मात्र गोलंदाजीमध्ये बदल होऊ शकतात. फलंदाजीत बदल होणार नसले तरी संघ फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करू शकतो. दरम्यान, भारत आणि यजमान न्यूझीलंडचा संघ गुरुवारी हॅमिल्टनहून वेलिंग्टनला दाखल झाले आहेत.

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये क्वचितच होणाऱ्या पाच सामन्यांची मालिका निकाली ठरल्यामुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने विविध क्रमबदलांना वाव आहे. परंतु प्रयोग आणि विजय यांचा समतोल राखणे आव्हानात्मक असेल. भारताने विजयी संघच कायम ठेवला तरी चालण्यासारखे आहे. कारण फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांतील महत्त्वाच्या स्थानांसाठीचे खेळाडू आपली चोख भूमिका बजावत आहेत. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत संधीच्या प्रतीक्षेत आहेत. पंतला संघात स्थान दिल्यास कोणत्या फलंदाजाला विश्रांती द्यावी, हे गणित कठीण आहे.

दुसरीकडे गोलंदाजीच्या माऱ्यात बदल अपेक्षित आहेत. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी संधीसाठी उत्सुक आहेत. संघ व्यवस्थापन फिरकी आणि वेगवान माऱ्यात एकेक बदल करू शकेल. सुंदर ऑस्ट्रेलियाच्या मोठय़ा मैदानांवर नवा चेंडू योग्य पद्धतीने हाताळू शकतो, अशी विराटला खात्री आहे. सुंदरमुळे तळाच्या फलंदाजीच्या फळीत बळ मिळू शकते. त्यामुळे पुढील दोन सामन्यांत त्याला संधी मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. शार्दूल ठाकूरच्या जागी सैनीला स्थान मिळू शकेल. तिसऱ्या सामन्यात भरवशाचा जसप्रित बुमरा महागडा ठरला होता. त्यामुळे आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकांच्या पार्श्वभूमीवर बुमरालाही विश्रांती दिली जाऊ शकते. २०१९च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेनंतर बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंडय़ा या तिघांनाही मोठय़ा दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने खेळाडूंच्या जोखमीचा मुद्दा ऐरणीवर असेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.