भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली याला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे उपकर्णधार रोहित शर्मा याला आगामी टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. ६ फेब्रुवारीपासून ही टी२० मालिका सुरु होणार असून या मालिकेत ३ सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेत रोहित शर्माला कर्णधार कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

रोहितने एकूण १२ टी२० सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यात त्याला ११ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे कोहलीने २० टी२० सामन्यांत नेतृत्व करताना भारताला १२ विजय मिळवून दिले आहेत. रोहितला आगामी टी२० मालिकेत विजय मिळवून कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. या यादीत सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याचा विक्रम माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावे आहे.

धोनीने ७२ सामन्यांत ४१ विजय मिळवले आहेत. मात्र टी२० क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून रोहितची विजयाची टक्केवारी (कमीत कमी ५ सामने) सर्वात जास्त आहे. रोहितची टक्केवारी ९१.६६ आहे, तर कोहलीची टक्केवारी ६३.१५ इतकी आहे.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतदेखील अखेरच्या दोन सामन्यांत रोहितनेच संघाचे नेतृत्व केले होते. त्यातील १ सामना भारताने जिंकला तर एक सामना भारताने गमावला.