दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. गेल्या काही दिवसांमध्ये फॉर्मात नसलेल्या लोकेश राहुलला डच्चू देण्यात आला आहे. राहुलच्या जागी भारतीय संघात शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. तर सलामीवीराची भूमिका रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी लोकेश राहुलला रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.

“संघातून डावलण्याबद्दल आम्ही लोकेश राहुलला कल्पना दिली होती. राहुल गुणवान खेळाडू आहे, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य दिसत नाहीये. मुरली विजय-शिखर धवन हे खेळाडू सध्या नसल्यामुळे सलामीच्या जोडीत सतत बदल करणं आम्हाला योग्य वाटत नाही. संघातल्याच कोणत्यातरी अनुभवी खेळाडूला ही जबाबदारी घेणं गरजेचं होतं. राहुलला सातत्याने संधी मिळत होती, मात्र त्याला कामगिरीत सातत्य दाखवता आलं नाही. तो ठराविक सामन्यांमध्ये चांगलं खेळत होता. ज्यावेळी लक्ष्मणला कसोटी संघातून वगळण्यात आलं होतं, त्यावेळी तो रणजी क्रिकेट खेळला, आणि एका हंगामात त्याने १४०० धावा काढत संघात दमदार पुनरागमन केलं होतं. राहुलनेही हाच मार्ग अवलंबला पाहिजे.” पत्रकारांशी बोलत असताना प्रसाद यांनी माहिती दिली.

आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल

अवश्य वाचा – Ind vs SA : कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीला संधी