भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून पहिली कसोटी खेळणाऱ्या रोहित शर्माने लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्वतःला सिद्ध केले. पहिल्या डावात १७६ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून खेळताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यातच त्याने आता आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या-सहाव्या क्रमांकावर अयशस्वी ठरल्यानंतर रोहितला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली. त्या संधीचं रोहितनं धमाकेदार खेळी करत सोनं केलं. रोहितने पहिल्या सामन्यात दीडशतक झळकावलेच, पण दुसऱ्या डावातही त्याने तुफान फलंदाजी करत शतक ठोकले. त्यामुळे रोहितच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पहिल्यांदाच खेळताना दोनही डावात शतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरला.

याशिवाय दोनही डावात शतक झळकावणारा रोहित शर्मा दुसरा सलामीवीर ठरला. या आधी सुनील गावसकर यांनी हा पराक्रम केला होता. तसेच, भारताकडून एकाच सामन्याच्या दोनही डावात शतके झळकावणाऱ्यांच्या यादीतही त्याने स्थान मिळवले. या आधी गावसकर यांनी तिनदा, द्रविडने दोन वेळा तर विजय हजारे, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांनी एकदा दोनही डावात शतक लगावण्याचा पराक्रम केला होता. त्यातच आता रोहितचे नावदेखील सामील झाले.