२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढवण्यात आला. यानंतरच्या विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी भारतीय निवड समितीने ऋषभ पंतला पहिली पसंती दिली. मात्र ऋषभला या संधीचं सोनं करता आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन टी-२० सामन्यात ऋषभ अनुक्रमे ४ आणि १९ धावा करु शकला. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे ऋषभच्या बेजाजबादर फटके खेळण्यावर नाराज असल्याचं समजतंय. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला विश्रांती देत, वृद्धीमान साहाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा – रोहितवर दबाव नाही, त्याला वेळ दिला जाईल – रवी शास्त्री
“निवड समितीचे सदस्य ऋषभ पंतला एक शेवटची संधी देण्याच्या विचारात आहेत. मात्र भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली ऋषभ पंतला पहिल्या कसोटीत संधी देण्याच्या विचारात आहे.” संघ व्यवस्थापनातील सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला माहिती दिली आहे. २ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
ऋषभचं फलंदाजीतलं अपयश आता त्याच्या यष्टीरक्षणाच्या कामात मध्ये येतंय. DRS घेताना त्याचे अंदाज फारसे योग्य ठरत नाहीयेत. भारतीय खेळपट्ट्यांवर जिथे चेंडू चांगलेच वळतात, तिकडे तो चांगला खेळ करेल की नाही याबद्दल साशंकता आहे. वृद्धीमान साहा हा पंतपेक्षा चांगला यष्टीरक्षक आहे, आणि मधल्या फळीत तो चांगल्या धावाही करतो, सुत्राने माहिती दिली. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळते की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 4:05 pm