भारतीय संघाने आपल्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात मोठ्या धडाक्यात केली आहे. फ्लोरिडाच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात, भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत वेस्ट इंडिजला ९५ धावांवर रोखलं. नवदीप सैनी-भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचे फलंदाज ढेपाळले. विंडीजचे दोन्ही सलामीवीर पहिल्या सामन्यात भोपळाही न फोडता माघारी परतले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात, भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाचे सलामीवीर शून्यावर बाद करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कँपबेलला माघारी धाडलं. यानंतर दुसऱ्याच षटकात भुवनेश्वर कुमारने एविन लुईसचा त्रिफळा उडवत विंडीजला आणखी एक धक्का दिला. अखेरीस अनुभवी खेळाडू कायरन पोलार्डने संयमी खेळी करत संघाला ९५ धावांचा टप्पा ओलांडून दिला.