विंडीजच्या लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

सामना सुरु होण्याआधी राखीव खेळाडू संजू सॅमसन घरच्या चाहत्यांसमोर मैदानावर फेरफटका मारत होता. त्यावेळी प्रशिक्षक रवी शास्त्री तेथे आले आणि त्यांनी त्याला मारण्याची कृती केली पण त्याला फटका न मारता हसत हसत मिठी मारली. हा सगळा प्रकार अत्यंत मजेशीर पद्धतीने सुरू होता. संजू सॅमसन मूळचा केरळचा असल्याने तिरुवअनंतपुरमचे मैदान हे त्याचे घरचे मैदान होते. पण त्याला संघात मात्र स्थान मिळू शकले नाही.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. एविन लुईस आणि शिमरॉन हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. सिमन्सने या सामन्यात नाबाद ६७ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर, जाडेजाने १-१ बळी घेतला.

त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक ठोकत महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.