भारत विरुद्ध विंडीज मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेक पाहुणे मंडळी आली आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर प्रथेनुसार घंटा वाजवून सामन्याची सुरुवात करण्यात आली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुंबईत होणारा चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना वानखेडे स्टेडियमवरून ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली होती. या निर्णयाबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने MCAने उच्च न्यायालयात धावही घेतली. पण अखेर हा सामना आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

कार्यकारिणी समिती व प्रशासकीय समिती दोन्हीही अस्तित्वात नसल्यामुळे कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या कोणी करायच्या, या अडचणीचा सामना सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशन करीत आहे. या सामन्याच्या दृष्टीने निविदासुद्धा त्यांना काढता येत नव्हत्या. त्यामुळे आर्थिक कोंडीचा सामना करणाऱ्या MCAने सामन्याच्या यजमानपदाबाबत असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला होता.