भारत विरुद्ध विंडीज हा दुसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात दोनही संघाने ३२१ धावा केल्या. तुलनेने दुबळ्या वाटणाऱ्या विंडीजने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत भारताला बरोबरीत रोखले. शाय होपच्या नाबाद १२३ धावा आणि हेटमायरची ९४ धावांची तडाखेबाज खेळी याच्या बळावर हा सामना बरोबरीत राखण्यात विंडीजला यश आले. त्यामुळे विराटने नाबाद १५७ धावांची खेळी करूनही सामना विजयाचा आनंद त्याला लुटला आला नाही. पण हा विजय न मिळण्यामागे अपत्यक्षपणे कोहलीच जबाबदार ठरला.

भारताचे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट आणि रायडू यांनी डाव सावरला आणि झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. पण ११व्या षटकात विराट कोहली आणि अंबाती रायुडु खेळपट्टीवर असताना विराटकडून एक चूक घडली. अॅशले नर्सच्या षटकाच्या एका चेंडूवर विराटने डीप मिडविकेटच्या दिशेने फटका मारला. त्याला दोन धावा घेण्याची संधी मिळाली. मात्र, दुसरी धाव घेताना विराट घाईघाईत पहिली धाव पूर्ण न करताच मागे फिरला. ती धाव ‘शॉर्ट’ देण्यात आली.

भारताला विराटने केलेली घाई नडली. जर ती धाव विराटने पूर्ण केली असती, तर कदाचित भारत सामना एका धावेने जिंकू शकला असता, अशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

दरम्यान, असाच योगायोग याआधी भारत – इंग्लंड सामन्यात घडला होता. या सामन्यात इशांत शर्माने १ धाव शॉर्ट काढली होती. तो सामनादेखील बरोबरीत सुटला होता.