यजमान विंडिजला टी २० पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही धूळ चारण्यात टीम इंडियाला यश आले. कर्णधार विराट कोहलीचे नाबाद शतक आणि मुंबईकर श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. सामन्यात विराट कोहलीने ९९ चेंडूत नाबाद ११४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने विंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विराटने या सामन्यात १४ चौकारांची आतषबाजी केली आणि आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४३ वे शतक झळकावले.

विराटने दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. विडिजला २४० धावांत रोखल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी २५५ धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा, शिखर धवन आणि ऋषभ पंत स्वस्तात बाद झाले. त्यानंतर विराटने आधी मुंबईकर श्रेयस अय्यर आणि नंतर केदार जाधवच्या साथीने भारताला सामन्यात विजय मिळवून दिला. या सोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका दशकात २० हजार धावांचा टप्पा गाठण्याचा भीमपराक्रम केला. क्रिकेटच्या इतिहासात या आधी भल्याभल्यांना हे शक्य झाले नव्हते. पण विराटने मात्र ही कामगिरी करून दाखवली. २०१० च्या दशकात त्याने ही कामगिरी केली असून हे दशक संपलेले नाही, त्यामुळे विराट आणखी किती धावा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

त्याआधी, पावसाने व्यत्यय आणलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने २४० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर अखेरीस १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. पण शिमरॉन हेटमायर, शाय होप यांना ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडलं. यानंतर निकोलस पूरन आणि जेसन होल्डरने फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र ते देखील आपल्या संघाला मोठा टप्पा गाठून देऊ शकले नाहीत. भारताकडून खलील अहमदने ३ बळी घेतले.