विराट कोहली आणि कंपनी सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि विंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी भारतीय कर्णधार विराट कोहली याने विंडिजचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सर व्हिव रिचर्ड्स यांची मुलाखत घेतली. BCCI ने या मुलाखतीतील पहिला भाग संकेतस्थळावर पोस्ट केला आहे.
विराटने या मुलाखतीत सर व्हिव रिचर्ड्स यांना बाऊन्सरबद्दल प्रश्न विचारला. “क्रिकेटमध्ये निर्भिड खेळाडू म्हणून तुमची ओळख होती. सुरूवातीला तुम्ही कोणीच हेल्मेट घालून खेळत नव्हतात. पण नंतर जेव्हा हेल्मेट वापरण्याची सुरूवात झाली, तेव्हादेखील तुम्ही कधीच हेल्मेट वापरले नाहीत. तुम्हाला बाऊन्सर चेंडूची भीती वाटली नाही का?”, असा प्रश्न विराटने त्यांना विचारला.
विराटच्या या बाऊन्सर प्रश्नावर त्यांनी झकास उत्तर दिले. “मी एक निर्भिड क्रिकेटपटू आहे. माझं हे वाक्य कदाचित तुम्हाला खटकेल. तुम्हाला मी उद्धटदेखील वाटेन. पण मी स्वत:ला नेहमी सांगत राहिलो की मी असा खेळ खेळतो आहे, ज्या खेळाबद्दल मला माहिती आहे आणि मी कायम स्वत:च्या खेळीवर विश्वास ठेवला. हेल्मेट घालणं मला कधीही रूचलं नाही, कारण हेल्मेट घालणं मला फार अडचणीचं वाटायचं. मला विंडिजकडून देण्यात आलेली जी मरून रंगाची टोपी होती, ती घालताना मला खूप अभिमान वाटायचा. जर चेंडू लागायचा असेल तर ते माझं नशीब आणि देवाची मर्जी.. असा विचार मी कायम करायचो”, असे सर व्हिव रिचर्ड्स म्हणाले.
Special: @imVkohli in conversation with @ivivianrichards (Part 1)
King Kohli turns anchor and quizzes the Caribbean Master to understand his fearless mindset – by @28anand
Full interview – https://t.co/HHGvlzfFEi pic.twitter.com/ikl7oifKSi
— BCCI (@BCCI) August 22, 2019
दरम्यान, भारत आणि विंडिज ही मालिका टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत खेळण्यात येणार आहे. २ सामन्यांची ही मालिका असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. भारत-विंडिज पहिला सामना २२ ते २६ ऑगस्ट तर दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा विविध टप्प्यात चालणार असून २ वर्षांनी या स्पर्धेची अंतिन फेरी खेळवण्यात येणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटचा स्तर उंचावेल, असे मत या स्पर्धेबाबत बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.