यजमान विंडिजला टी २० पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही धूळ चारण्यात टीम इंडियाला यश आले. कर्णधार विराट कोहलीचे नाबाद शतक आणि मुंबईकर श्रेयस अय्यरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी केली. त्याने ४१ चेंडूत ६५ धावा केल्या. या खेळीत त्याने चौकारांपेक्षाही षटकार जास्त मारले. त्याने ३ चौकार आणि ५ षटकार लगावले.

सामन्यानंतर BCCI च्या चहल टीव्हीवर फिरकीपटू युझवेंद्र चहल याने श्रेयस अय्यरची मुलाखत घेतली. त्यात चहलने श्रेयसला बरेच प्रश्न विचारले. त्यावेळी श्रेयसच्या खेळीबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “मला विंडिजच्या फलंदाजाने षटकार लगावला होता, म्हणून तू त्यांच्या गोलंदाजांना उत्तुंग षटकार लगावलास का?”, असा प्रश्न मुलाखती दरम्यान चहलने उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना श्रेयस म्हणाला की हो.. नक्कीच! तुझ्या गोलंदाजीवर विंडिजच्या पूरनने लांब षटकार लगावला होता. आपल्या संघातील खेळाडूला षटकार लगावल्यावर अपण त्यांना कसं काय सोडून द्यायचं, म्हणूनच मी त्यांच्या गोलंदाजांचा समाचार लगावला आणि सामन्यातील सर्वात मोठा षटकार लगावला.

याशिवाय, “इतका चांगला खेळ करण्यामागे काय रहस्य आहे? सकाळी काही ‘स्पेशल’ नाश्ता केला होतास का?” असाही प्रश्न चहलने श्रेयसला विचारला होता. त्यावर “मी नेहमीप्रमाणेच ३ अंड्यांचा नाश्ता केला होता. पण दडपणाच्या स्थितीत खेळताना मला मजा येते आणि माझी कामगिरी चांगली होते”, असे श्रेयस म्हणाला.