भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघावर ७ गडी राखून मात केली आहे. विजयासाठी दिलेलं ४८ धावांचं आव्हान भारतीय संघाने ३ गडी गमावत पूर्ण केलं. भारताकडून या सामन्यात फलंदाजीमध्ये कर्णधार शुभमन गिल, जलल सक्सेना तर गोलंदाजीत शार्दुल ठाकूर आणि शाहबाज नदीम चमकले.

नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी आश्वासक मारा केला. शार्दुल ठाकूर-कृष्णप्पा गौथम यांनी प्रत्येकी ३-३ तर शाहबाज नदीमने २ बळी घेत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. अखेरच्या फळीत मार्को जान्सेन आणि डेन पिडेटने छोटीशी भागीदारी रचत आफ्रिकेला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. आफ्रिकेचा पहिला डाव १६४ धावांवर रोखण्यात भारताला यश मिळालं. प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात भारताने कर्णधार शुभमन गिल आणि जलल सक्सेनाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ३०३ धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिलने ९० धावांची खेळी केली.

दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या डावाला पुन्हा एकदा गळती लागली. आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर झुबेर हमझा, हेन्रिच क्लासेन आणि मल्डर या फलंदाजांनी आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. दुसऱ्या डावात भारताकडून नदीमने ३, शार्दुल ठाकूर-जलज सक्सेनाने प्रत्येकी २-२ मोहम्मद सिराज आणि कृष्णप्पा गौथम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. विजयासाठी आवश्यक असलेलं भारत अ संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सलामीचे फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर मुंबईच्या शिवम दुबेने दोन चेंडूत दोन षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.