पहिल्या दिवसावर भारतीय ‘अ’ संघाचे वर्चस्व

बेंगळूरु : आंध्रप्रदेशचा गुणी फलंदाज हनुमा विहारीने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीतील साकारलेल्या नाबाद १५व्या शतकामुळे भारतीय ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीच्या पहिल्या दिवशी ४ बाद ३२२ धावांपर्यंत मजल मारली. अकिंत बावणेनेही ८० धावांचे योगदान देताना विहारीला योग्य साथ दिली.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात अनुक्रमे द्विशतक व शतक झळकावणाऱ्या मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांना आज फारशी चमक दाखवता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच षटकात अगरवाल भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर लगेचच पृथ्वी (१६ धावा) बाद झाल्याने भारताची २ बाद १८ धावा अशी अवस्था झाली. मात्र विहारी आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सांभाळला. उपाहाराला अवघा थोडा अवधी असताना अय्यर ३९ धावांवर बाद झाला.

त्यानंतर बावणेच्या साथीने विहारीने भारताला गाडी रुळावर आणली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी रचली. १० चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने ८० धावा काढून बावणे बाद झाला, मात्र विहारीने दिमाखात फलंदाजी करताना शतकाला गवसणी घातली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विहारी १३ चौकारांसह १३८ धावांवर, तर श्रीकर भरत ३० धावांवर खेळत होते. या मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव व ३० धावांनी जिंकला होता. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे, असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ (पहिला डाव) : ९० षटकांत ४ बाद ३२२ (हनुमा विहारी १३८*, अंकित बावणे ८०; सेुनरान मुथूसॅमी १/५१).