भारताचा ‘अ’ क्रिकेट संघ पुढील वर्षी जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) एका पदाधिकाऱयाने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड या संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार असून दक्षिण आफ्रिका दौरा भारताच्या युवा खेळाडूंसाठी नवी संधी ठरेल, असे मत बीसीसीआयच्या पदाधिकाऱयाने व्यक्त केले. नुकतेच स्थानिक क्रिकेट सामन्यांत ऋषभ पंत, प्रियांक पांचाळ यांनी दमदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे परदेश दौऱयात या खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी असणार आहे.
वाचा: भारतीय क्रिकेट संघाचा दूरचित्रवाणीवर ‘सराव’
भारताचा अ क्रिकेट संघ पुढील वर्षी जून महिन्यात द.आफ्रिका दौरयावर असेल त्याचवेळी भारतीय संघ इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा खेळणार आहे. युवा खेळाडूंना परदेशी खेळपट्ट्यांचा अनुभव यावा आणि युवा खेळाडूंना नवी संधी मिळावी या उद्देशाने पुढील वर्षी जून महिन्यात भारतीय अ क्रिकेट संघाचा द.आफ्रिका दौऱया निश्चित करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱयाने सांगितले. द.आफ्रिका दौऱयात चार दिवसीय कसोटी सामन्यांसह एकदिवसीय मालिकेचाही समावेश असणार आहे. याआधी भारताच्या अ क्रिकेट संघाने २०१३ साली द.आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यात भारतीय संघाने विजय प्राप्त केला होता. चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना आणि रोहित शर्मा देखील भारताच्या अ संघाकडून त्यावेळी खेळले होते. यावेळीच्या दौऱयासाठी बीसीसीआय पदाधिकाऱयाने ऋषभ पंत आणि प्रियांक पांचाळ या युवा खेळाडूंचा आवर्जुन उल्लेख केला. ऋषभ आणि प्रियांकसारख्या खेळाडूंसाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.
वाचा: विराट कोहली माझ्यापेक्षा दुप्पट आक्रमक- सौरव गांगुली
प्रियांक पांचाळ याने स्थानिक क्रिकेट सामन्यांत १ हजारहून अधिका धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि इशान किशन या युवा खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे हे खेळाडू परदेशात आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून देतील का? परदेशातील वातावरणात खेळण्याची त्यांची तयारी आहे का? याची कसोटी घेण्यासाठी निवड समितीलाही संधी मिळणार आहे.

