भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील दोन सामने बाकी आहे. यामधील तिसरा कसोटी सामना सात जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. तर चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील मैदानावर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडू सराव करत असतानाच चौथ्या कसोटी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघानं घेतल्याचं वृत्त आहे. कारण, ब्रिस्बेनमधील क्वारंटाइन नियम अतिशय कडक आहेत. भारतीय संघ दोन महिन्यापासून ऑस्ट्रेलियात बायो बबलच्या नियमाचं पालन केलं असतानाही इतक्या कडक क्वारंटाइनची गरज आहे का? जर नियम शिथिल करणार नसाल, तर ब्रेस्बेनला आमचा संघ पोहचणार नाही, असं बीसीसीआयनं स्पष्ट केल्याचं वृत्त आहे.

आयपीएलनंतर दुबईतून ऑस्ट्रेलियाला पोहोचलेल्या भारतीय संघ१४ दिवसाच्या क्वारंटाइनमध्ये होता. त्यानंतर इतरांप्रमाणे स्वातंत्र्य मिळेलं असं भारतीय संघाला वाटलेलं, मात्र आता ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला पुन्हा एकदा बायो बबलमध्ये जावं लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना हॉटेल ते स्टेडियम एवढाच प्रवास करता येईल. त्याव्यतिरिक्त कुठेही बाहेर जाण्यावर बंदी आहे. त्यामुळे भारतीय संघानं ब्रेस्बेनला जाण्याएवजी सिडनीमध्येच राहायचं ठरवलं आहे.

ऑस्ट्रेलिया पोहोचण्याआधी दुबईमध्ये क्वारंटाइन होतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियात आल्यानंतर पुन्हा १४ दिवस क्वारंटाइन झालो. याचा अर्थ आम्ही महिनाभर कठीण बबलमध्ये होतो. दौरा संपताना आम्हाला पुन्हा क्वारंटाईन व्हायचं नाही. आम्हाला ब्रिस्बेनला जायची इच्छा नाही. ऑस्ट्रेलियातील सध्याच्या परिस्थितीची आम्हाला जाणीव आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आम्ही बायो बबलच्या नियमांप्रमाणे प्रत्येकवेळी सहकार्य केलं आहे. आम्ही क्वारंटाइनमध्ये वेळ घालवल्यानंतर इतर ऑस्ट्रेलियन नागरिकांप्रमाणेच स्वातंत्र्य मिळेल असं वाटतं होतं. पण आता पुन्हा आम्हाला क्वारंटाइन व्हायचं नाही, असं टीम इंडियाच्या सूत्राने सांगितलं.

भारतीय टीम सोमवारी सिडनीला रवाना होणार आहे. सात जानेवारीपासून सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.