भारताच्या रामकुमार, प्रज्ञेशचा एकेरीत पराभव; क्रोएशियाकडे २-० अशी आघाडी

झाग्रेब : भारतीय टेनिस संघाला शनिवारी मध्यरात्री झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील पात्रता सामन्यात क्रोएशियाविरुद्ध पहिल्याच दिवशी अपयशाला सामोरे जावे लागले. रामकुमार रामनाथन आणि प्रज्ञेश गुणेश्वरन या दोघांनाही पुरुष एकेरीच्या लढतींमध्ये पराभव पत्करावा लागल्याने क्रोएशियाने २-० अशी आघाडी घेतली असून उर्वरित तीनही लढती जिंकणे भारतासाठी अनिवार्य झाले आहे.

डोम स्पोटरेव्हा येथे सुरू असलेल्या या सामन्यात पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत ३० वर्षीय प्रज्ञेशला जागतिक क्रमवारीत तब्बल २७७व्या स्थानी असलेल्या बोर्ना गोजोने पराभवाचा धक्का दिला. गोजोने प्रज्ञेशवर ३-६, ६-४, ६-२ अशी पिछाडीवरून सरशी साधत तीन सेटमध्ये मात केली. गोजोने कारकीर्दीत प्रथमच डेव्हिस चषकातील एखादी लढत जिंकली. तर पहिल्या सेटनंतर केलेल्या क्षुल्लक चुकांचा फटका प्रज्ञेशला महागात पडला.

एकेरीच्या दुसऱ्या लढतीसाठी कर्णधार रोहित राजपालने सुमित नागलऐवजी २५ वर्षीय रामकुमारवर विश्वास दर्शवत त्याला एकेरीत खेळण्याची संधी दिली. रामकुमारनेसुद्धा २०१४च्या अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या विजेत्या मरिन चिलिचला विजयासाठी कडवा संघर्ष करण्यास भाग पाडले. परंतु अखेरीस २ तास आणि १२ मिनिटे रंगलेल्या या फेरीत चिलिचने रामकुमारवर ७-६ (१०-८), ७-६ (१०-८) अशी सरशी साधून क्रोएशियाला दिवसअखेर २-० अशा भक्कम स्थितीत नेले.

शनिवारी मध्यरात्री खेळल्या जाणाऱ्या दुहेरीच्या लढतीत भारताचे आव्हान कायम राखण्यासाठी लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा यांना विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतरच परतीच्या एकेरी सामन्यात प्रज्ञेश आणि रामकुमारच्या कामगिरीवर भारताला अवलंबून राहावे लागणार आहे.