विजेतेपदासाठी भारतापुढे बांगलादेशचे आव्हान

नाटय़मय, अनपेक्षित आणि रोमहर्षक विजयासह बांगलादेशने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरी गाठली आहे. मात्र निदाहास चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर भारताचे पारडे जड मानले जात आहे.

स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या दुसऱ्या फळीने सलग तीन विजय नोंदवले. बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही रंगतदार सामने आश्चर्यकारकरीत्या जिंकले. शुक्रवारी महमदुल्ला रियाधने अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार खेचून श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. त्यामुळे बांगलादेशच्या संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे.

मात्र शकिब उल हसनने संघाला मैदानाबाहेर येण्याची सूचना करणे आणि सामन्यानंतर ड्रेसिंग रूमची नासधूस करणे या घटनांमुळे बांगलादेशचा संघ वादात सापडला आहे. यातून त्यांना सावरण्याची नितांत आवश्यकता आहे.

भारताच्या पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतींना जसा क्रिकेट इतिहास आहे, तसा भारत-बांगलादेश लढतीला नाही. २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मेलबर्नला झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंचांचे काही निर्णय विरोधात गेल्यामुळे आपला पराभव झाल्याचा समज बांगलादेशने करून घेतला आहे. त्या घटनेपासून भारत हा क्रिकेटमधील आपला कट्टर वैरी असल्याप्रमाणेच ते खेळू लागले आहेत. त्याच वर्षी भारतीय संघाने बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावली होती. त्यानंतर मुंडन केलेल्या भारतीय खेळाडूंची छायाचित्रे ढाकामधील रस्त्यांवर तेथील नागरिकांनी झळकावली होती.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टिरक्षक).

बांगलादेश : शकिब अल हसन (कर्णधार), महमदुल्लाह, तमीम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रुल कायेस, मुशफिकर रहिम (यष्टिरक्षक), शब्बीर रेहमान, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसेन, तस्कीन अहमद, अबू हिदर, अबू जायेद, अरिफूल हक, नझमूल इस्लाम, नुरूल हसन, मेहिदी हसन, लिटन दास.

* सामन्याची वेळ : सायं. ७ वा.

* थेट प्रक्षेपण : डीस्पोर्ट्स, जिओ टीव्ही अ‍ॅप, रिश्ते सिनेप्लेक्स.

शकिब व नुरूल यांना दंड

कोलंबो : पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेतल्याबद्दल बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनवर सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याचप्रमाणे त्याच्या खात्यावर गैरवर्तनाचा एक गुण जमा करण्यात आला आहे. याचप्रमाणे अन्य एका घटनेसंदर्भात आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राखीव खेळाडू नुरूल हसनलाही २५ टक्के दंड करण्यात आला आहे. तसेच गैरवर्तनाचा एक गुण त्याला देण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील २०व्या षटकात इसुरू उडानाने दुसऱ्यांदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. परंतु मैदानावरील पंचांनी तो नोबॉल दिला नाही. त्यामुळे पंचांच्या निर्णयावर नाराज झालेला शकिब सीमारेषेपाशी आला आणि त्याने आपल्या फलंदाजांना मैदानाबाहेर येण्याची सूचना केली होती. आणखी एका घटनेत दोन्ही फलंदाजांना सूचना देण्यासाठी पाणी घेऊन मैदानावर गेलेल्या नुरूलने श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराच्या दिशेने बोट दाखवत काही तरी उच्चारले होते.