स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी आणि शफाली वर्माच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने ९ बाद ३९६ धावांवर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल टीम इंडिया पहिल्या डावात २३१ धावांवर बाद झाली. इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर अखेरच्या दिवशी दुसर्‍या डावात ८ बाद ३४४ धावा करुन भारताने सामना वाचवला. दोन्ही डावात अर्धशतके ठोकणाऱ्या शफालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पदार्पणवीरांची झुंज

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शफाली वर्मा आणि स्नेह राणा यांनी आपली चमक दाखविली. दुसर्‍या डावात शफाली वर्माने ६३, दीप्ती शर्माने ५४, पूनम राऊतने ३९, स्नेह राणाने नाबाद ८० आणि तानिया भाटियाने नाबाद ४४ धावा केल्या. एका वेळी भारतीय संघ २४० धांवात ८ गडी गमावल्यानंतर पराभवाच्या मार्गावर होता, पण स्नेह राणा आणि भाटियाने १०४ धावांची नाबाद शतकी भागीदारी करून भारताला पराभवापासून वाचवले.

 

स्नेह राणाने अष्टपैलू कामगिरी दाखवली आहे. गोलंदाजीत तिने ४ बळी घेतले आणि फलंदाजीतही दमदार कामगिरी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले.

संक्षिप्त धावफलक –

  • नाणेफेक – इंग्लंड (फलंदाजी)
  • इंग्लंड पहिला डाव – ३९६ ९ (डा घोषित)
  • भारत पहिला डाव – २३१/१०
  • भारत दुसरा डाव (फॉलोऑन) – ३४४/८ (सामना अनिर्णित)