टोक्यो : गरुजत सिंगने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारताने टोक्यो ऑलिम्पिकमधील हॉकी क्रीडाप्रकारातील पुरुष विभागात जपानला ५-३ असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीतील स्थान यापूर्वीच पक्के करणाऱ्या भारताने या विजयासह यजमान जपानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ‘अ’ गटात पाच सामन्यांतील चार विजयांच्या १२ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १३ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले. आता रविवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत भारतासमोर ‘ब’ गटातील तिसऱ्या क्रमांकावरील संघ म्हणजेच ग्रेट ब्रिटनचे आव्हान असणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताने जपानविरुद्ध  सुरुवातीपासूनच मुक्त शैलीतील खेळ केला. गरुजत सिंगने अनुक्रमे १७ आणि ५६व्या मिनिटाला भारतासाठी दोन गोल केले. हरमनप्रीत सिंग (१३ मि.), शमशेर सिंग (३४ मि.) आणि निलकांता शर्मा (५१ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून गरुजतला उत्तम साथ दिली. जपानकडून केन्टा टानाका (१९ मि.), कोटा वाटानबे (३३ मि.) आणि कझुमा मुराटा (५९ मि.) यांनी गोल नोंदवले.

नवनीतचा निर्णायक गोल; महिलांच्या आशा कायम

अखेरची तीन मिनिटे शिल्लक असताना नवनीत कौरने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने आर्यलडवर १-० अशी मात केली. या विजयासह भारताने ‘अ’ गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा अद्याप कायम राखल्या आहेत.