‘आयपीएलच्या देशा’ असे भारताचे क्रिकेटच्या जागतिक नकाशावर आता वर्णन केले जाते. फक्त आयपीएल डागाळल्यामुळे ते अभिमानास्पद मानले जात नाही. परंतु खेळाडूंच्या बाबतीत विचार केल्यास अनेक युवा खेळाडूंना आर्थिक पाठबळ या आयपीएलमुळे मिळाले आहे. त्यामुळे ‘ट्वेन्टी-२०’पटूंचे खास पीक आता देशात बेसुमार पिकू लागले आहे. वर्षभरातील तीन महिने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यक्रमपत्रिकेत आयपीएल, चॅम्पियन्स लीग आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेसाठी खर्ची घातले जातात. भारताचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज क्रिकेटपटूही दुखापती वगैरे बाजूला सारून आयपीएल खेळण्यासाठी सज्ज होतात. परंतु तरीही २००७मध्ये ट्वेन्टी-२० जगज्जेत्या ठरलेल्या भारताला पुढील तीन स्पर्धामध्ये अपयश पदरी पडले. उदंड स्पर्धात्मक वातावरण मिळवणारा हा भारतीय संघ अत्यंत कमी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतो. याचे गांभीर्य अद्याप भारताला लक्षात आलेले नाही. याचप्रमाणे अनेक देशांनी ट्वेन्टी-२०साठी आपले खास संघ निर्माण केले आहेत. पण २००७पासून धोनीच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. तूर्तास भारताच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा घेतलेला आढावा.
२००७ : अनपेक्षित जगज्जेतेपद
२००७ हे वर्ष भारतासाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ची अनुभूती देणारे ठरले. कॅरेबियन बेटांवर झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पध्रेत भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. त्यामुळे राहुल द्रविडला आपले कर्णधारपद सोडावे लागले. मग युवा महेंद्रसिंग धोनीकडे ते सोपवण्यात आले. या पाश्र्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या विश्वचषकात भारतीय संघाकडून माफकच अपेक्षा करण्यात येत होत्या. परंतु धोनीने ताज्या दमाच्या ख्ेाळाडूंना घेऊन चमत्कार घडवला आणि पहिल्या विश्वचषकावर मोहोर उमटवली. या स्पध्रेत ड-गटात भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला होता. या दोन परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील लढत ही अंतिम सामन्यापेक्षा थरारक होती. हा सामना मुळात ‘टाय’ झाला. मग ‘बॉल आऊट’ सूत्रानुसार निर्णय लावताना वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनी अचूक यष्टिवेध केला. परंतु पाकिस्तानकडून यासिर अराफत, उमर गुल आणि शाहीद आफ्रिदी यांना यष्टीचा वेध घेता आला नाही. त्यामुळे ३-० अशा फरकानिशी भारतीय संघाने हा सामना जिंकला. ‘सुपर-एट’मध्ये भारत, न्यूझीलंड, द. आफ्रिका आणि इंग्लंड एका गटात तर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश यांचा दुसऱ्या गटात समावेश होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने एक अविस्मरणीय पराक्रम नोंदवताना फक्त १२ चेंडूंत अर्धशतकाची नोंद केली. स्टुअर्ट ब्रॉडच्या सहा चेंडूंवर सहा षटकार खेचण्याची किमया युवीने या स्पध्रेत दाखवली. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा, तर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा भारत-पाकिस्तान सामन्याची रंगत क्रिकेट रसिकांना अनुभवता आली. अखेरच्या षटकात पाकिस्तानला १३ धावांची आवश्यकता होती, तर त्यांची अखेरची जोडी मैदानावर होती. इरफान पठाण, आर. पी. सिंग आणि एस. श्रीशांत यांचा गोलंदाजीचा कोटा संपल्यामुळे धोनीने हरभजनकडे चेंडू देऊ केला. परंतु भज्जीची हे निर्णायक षटक टाकण्याची हिंमत होईना. त्यामुळे नाइलाजास्तव जोगिंदर शर्माकडे चेंडू देण्यात आला. झुंजार आणि अनपेक्षित विजयासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा विजय पक्का मानला जाऊ लागला. जोगिंदरने पहिलाच चेंडू वाइड टाकला. मग निर्धाव टाकला. मग दुसऱ्या फुलटॉस चेंडूवर मिसबाह उल हकने षटकार खेचला. मग तिसऱ्या चेंडूवर फाइन लेगच्या डोक्यावर पॅडल-स्कूप करण्याचा प्रयत्न मिसबाहने केला. परंतु हा चेंडू शॉर्ट फाइन लेगला उभ्या श्रीशांतच्या हातामध्ये विसावला. अशा रीतीने तीन चेंडू आणि पाच धावा बाकी असतानाच भारताच्या जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
२००९ : पाटी कोरी
इंग्लंडमध्ये २००९साली झालेल्या दुसऱ्या विश्वचषक स्पध्रेत भारताने साखळीचा अडसर आरामात पार केला. पण ‘सुपर-एट’मध्ये भारताची पाटी कोरी राहिली. भारताच्या गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या लढतीत फिडेल एडवर्डच्या आखूड टप्प्याच्या चेंडूने भारताची दैना उडवली. रोहित शर्मा, सुरेश रैना आणि युवराज असे महत्त्वाचे बळी त्याने घेतले. विंडीजने सात विकेट राखून ही लढत आरामात जिंकली. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत १५३ धावांचे आव्हान पेलताना भारताला तीन धावा कमी पडल्या. युवराजला बाजूला सारून रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची धोनीची चाल फोल ठरली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याने कासवछाप फलंदाजीचे प्रदर्शन करताना २५ धावा काढण्यासाठी ३५ चेंडू घेतले. मग युवराज, धोनी आणि युसूफ पठाणने फटकेबाजी करून धावांचा वेग वाढवला. परंतु भारत अपयशी ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला १३० धावांचे आव्हान पेलता आले नाही आणि १२ धावांच्या फरकाने पराभूत झाल्यामुळे आव्हान संपुष्टात आले.
२०१० : फिर वहीं कहानी!
२०१०मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पध्रेत भारतीय फलंदाजांची कामगिरी समाधानकारक झाली नाही. फक्त रैनाने शतकासह पाच सामन्यांत २१९ धावा केल्या. धोनीने पाच सामन्यांत ८५, तर रोहित शर्माने ८४ धावा केल्या. साखळीत भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. पण खरी परीक्षा ‘सुपर-एट’मध्ये होती. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांचा भारताच्या गटात समावेश होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर तेजाने तळपला आणि त्यांनी पाच बाद १८४ अशी धावसंख्या उभारली आणि ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेल बरसला; पण भारताने ही लढत १४ धावांनी गमावली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताने रैनाच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पाच बाद १६३ धावा उभारल्या. परंतु ही लढत श्रीलंकेने पाच विकेट राखून जिंकली. त्यामुळे पुन्हा भारतीय संघाची पाटी कोरी राहिली.
२०१२ : गणिती अपयश
श्रीलंकेत झालेल्या २०१२च्या विश्वचषक स्पध्रेत भारताने एकंदर पाचपैकी फक्त एक सामना गमावला. परंतु सांघिक कामगिरी पुरेशी चांगली नसल्यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. साखळीत इंग्लंड आणि अफगाणिस्तानला हरवणाऱ्या भारताने सुपर-एटमध्ये दोन विजय मिळवले. पण ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह समान गुणांवर असलेल्या भारताला गणिती समीकरणाने दगा दिला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताच्या पहिल्या सुपर-एट लढतीत शेन वॉटसनच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट राखून आरामात विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या नाबाद ७८ धावांच्या खेळीमुळे भारताला विजय मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अखेरची लढत भारताला मोठय़ा फरकाने जिंकायची होती; पण त्याचे भान न राखल्यामुळे फक्त एक धावेने रडतखडत विजय भारताला मिळाला.
२०१४ : भारतापुढे अवघड आव्हान
बांगलादेशमध्ये होणाऱ्या पाचव्या विश्वचषक स्पध्रेत प्रथमच १६ संघ सहभागी होत आहेत. यापैकी आठ दुबळे संघ साखळी फेरी खेळतील आणि दोन संघ सुपर-१०साठी पात्र ठरतील. तथापि, आठ दिग्गज संघांना आधीच सुपर-१०मध्ये स्थान देण्यात आले आहे. पहिल्या गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. २१मार्चला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अभियानाला प्रारंभ होणार आहे. अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघाला या स्पध्रेत दिलासादायी कामगिरीची अपेक्षा आहे.