झाग्रेब : सुमित नागल आणि प्रज्ञेश गुणेश्वरन यांसारख्या अव्वल टेनिसपटूंचा समावेश असलेल्या भारताचा डेव्हिस चषक पात्रता फेरीतील सामना शुक्रवारपासून क्रोएशियाशी होणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या क्रोएशियाला नमविण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

जागतिक क्रमवारीत ३७व्या स्थानी असलेला आणि २०१४ साली अमेरिकन ग्रँडस्लॅम जिंकणारा मारिन चिलिच हा एकमेव खेळाडू क्रोएशिया संघात आहे. बोर्ना कोरिक याच्या अनुपस्थितीमुळे आता बोर्ना गोजो याच्यावर क्रोएशियाची एकेरीतील भिस्त असेल. त्यामुळे नागल आणि प्रज्ञेश यांना एकेरीची ही लढत जिंकणे सहज शक्य होऊ शकते. गोजो याला अद्याप डेव्हिस चषकात एकही लढत जिंकता आलेली नाही.

विवाह सोहळ्यामुळे प्रज्ञेशला गेल्या लढतीत खेळता आले नव्हते. त्यामुळे भारताला एकेरीतील दुसऱ्या टेनिसपटूची उणीव प्रकर्षांने जाणवली होती. लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा दुहेरीत उतरणार असल्यामुळे रामकुमार रामनाथनला मात्र संधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुहेरीतील सामना भारतासाठी महत्त्वाचा असून या सामन्यातील विजेता या वर्षीच्या डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीसाठी आपल्या संघाला पात्र करू शकतो. पेसने या मोसमाअखेरीस निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याच्यासाठी ही अंतिम लढत ठरू शकते.

भारताला गेल्या काही वर्षांत परदेशात एकही लढत जिंकता आलेली नाही. २०१८मध्ये सर्बियाविरुद्ध आणि २०१७मध्ये कॅनडाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे जागतिक गटात स्थान मिळवण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले होते. याआधी भारत आणि क्रोएशिया हे संघ १९९५मध्ये आमने-सामने आले होते, त्या वेळी भारताने ३-२ अशी सरशी साधली होती.

क्रोएशिया संघ आम्हाला सहजतेने घेणार नाही. पहिल्या दिवशी आम्ही दोन्ही सामने गमावले तर आगेकूच करणे कठीण होईल. नवे स्टेडियम आणि कोर्ट आमच्यासाठी पूरक आहे. क्रोएशियाला घरच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळणार असला तरी आम्ही आमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार आहोत.

– रोहित राजपाल, भारताचा न खेळणारा कर्णधार