इस्लामाबाद येथेच सामना खेळवण्याबाबत आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ ठाम

नवी दिल्ली : इस्लामाबादमधील सुरक्षाव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषकाची लढत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढत इस्लामाबादमध्येच नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे.

अखिल भारतीय टेनिस संघटनेकडून (एआयटीए) ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अथवा पुढे ढकलण्यात यावी, अशी सातत्याने मागणी होत होती. दोन्ही देशांतील राजकीय संबंध सध्या बिघडल्यामुळे खेळाडूंच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच ‘एआयटीए’ने इस्लामाबादमधील सुरक्षेविषयी आक्षेप घेतला होता. त्यानुसार ‘आयटीएफ’च्या डेव्हिस चषक समितीने तातडीची बैठक बोलावून ही लढत इस्लामाबादमध्येच खेळवण्याचा निर्णय घेतला. लढतीच्या निश्चित तारखा ९ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येतील.

‘‘स्पर्धेच्या तारखा पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार असल्या तरी यापुढेही पाकिस्तानातील परिस्थितीवर नजर ठेवण्यात येईल,’’ असे ‘आयटीएफ’कडून सांगण्यात आले.

स्वतंत्र सुरक्षा सल्लागारामार्फत पाकिस्तानातील सुरक्षेव्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषकाच्या आशिया-ओशियाना गटातील ही लढत पुढे ढकलण्याचा निर्णय डेव्हिस चषक समितीने घेतला आहे. खेळाडू, अधिकारी आणि चाहत्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहील.

      – आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ