भारताचा आज न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना

लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारताचा शनिवारी पहिला सराव सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघ चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून कोणाला अजमावणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून या सराव सामन्यांकडे पाहिले जाते. स्पर्धेच्या दृष्टीने काही प्रयोगसुद्धा यात पाहायला मिळतात. भारतीय संघ लोकेश राहुल किंवा विजय शंकर यांना चौथ्या क्रमांकासाठी संधी देऊ शकेल.

१९८३ आणि २०११मध्ये विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ तिसऱ्या विश्वविजेतेपदाच्या निर्धाराने इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. १९९२प्रमाणेच यंदा राऊंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा होणार असल्यामुळे धक्कादायक निकाल अपेक्षित असल्याचा इशारा कर्णधार विराट कोहलीने आधीच दिला आहे. भारताच्या विश्वचषक अभियानाला साऊदम्पटन येथे ५ जूनला होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने प्रारंभ होणार आहे.

रोहित शर्मा आणि शिखर धवन हे आक्रमक सलामीवीर भारताकडे आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा जगातील सर्वोत्तम फलंदाज कोहली, सामन्याला कलाटणी देऊ शकणारा अनुभवी महेंद्रसिंह धोनी, अष्टपैलू केदार जाधव, धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंडय़ा यांच्यामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत भासत आहे.

भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा सांभाळत आहे. याशिवाय मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक यांची साथ त्याला मिळेल. कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल या मनगटी फिरकी गोलंदाजांमुळे भारताची गोलंदाजी वैविध्यपूर्ण झाली आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक यशस्वी फलंदाज रॉस टेलरने भारताविरुद्धचा सराव सामना विश्वचषकाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल, असे म्हटले आहे. याशिवाय कर्णधार केन विल्यम्सनचा अनुभव किवींसाठी महत्त्वाचा असेल. न्यूझीलंडचा संघ १९ फेब्रुवारीला अखेरचा एकदिवसीय सामना बांगलादेशविरुद्ध खेळला आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.

’  सामन्याची वेळ : दुपारी ३ वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.

दुखापतीमुळे लॅथमची माघार

बोटाला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टॉम लॅथमने भारताविरुद्धच्या सराव सामन्यातून माघार घेतली आहे. त्याच्या जागी टॉम ब्लंडेल खेळणार आहे, अशी माहिती न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने दिली. विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अखेरच्या सराव सामन्यात लॅथमच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला विश्वचषकाच्या दोन्ही सामन्यांना मुकावे लागणार आहे, असे विल्यम्सनने सांगितले.