नॅपियर येथे होणाऱ्या एकदिवसीय सामन्याने भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी न्यूझीलंड दौऱ्याला प्रारंभ करणार आहे. याशिवाय ऑकलंड आणि वेलिंग्टन या ठिकाणी दोन कसोटी सामने होणार आहेत.
पुढील वर्षी १९ जानेवारीपासून होणाऱ्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतराष्ट्रीय सामने आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. या वर्षी ईडन पार्कला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याला सुमारे ३९ हजार क्रिकेटरसिकांनी हजेरी लावली होती. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या निमित्ताने पुन्हा कसोटी ईडन पार्कला अवतरणार आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी हॉकिन्स बेसिन रिझव्‍‌र्ह या ठिकाणी होणार आहे. हॅमिल्टनच्या सेडॉन पार्कवर दोन एकदिवसीय सामने होणार आहेत. तथापि, ऑकलंड आणि वेलिंग्टनवासीयांना कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचा आस्वाद घेता येणार आहे. भारतीय संघ त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे.

एकदिवसीय मालिका
१.    १९ जानेवारी    नॅपियर
२.    २२ जानेवारी    हॅमिल्टन
३.    २५ जानेवारी    ऑकलंड
४.    २८ जानेवारी    हॅमिल्टन
५.    ३१ जानेवारी    वेलिंग्टन

कसोटी मालिका
१.    ६ ते १० फेब्रुवारी    ऑकलंड
२.    १४ ते १८ फेब्रुवारी     वेलिंग्टन