तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सिडनी वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६६ धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ३०८ धावांपर्यंतच मजल मारु शकली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने ९० तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली, परंतू त्यांचे प्रयत्न व्यर्थच ठरले.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात आश्वासक झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने २२ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. एका क्षणाला टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी होती. यानंतर भरवशाच्या लोकेश राहुलनेही निराशा करत माघारी परतण पसंत केलं. ४ बाद १०१ अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अखेरीस शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सावरलं. दोन्हबी फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली.

शिखर आणि हार्दिरक पांड्या भागीदारी करत असताना टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू फिरकीपटू झॅम्पाने टीम इंडियाची जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पुनरागमन करुन दिलं. ७४ धावांची खेळी करत धवन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो देखील सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी परतला. पांड्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्याा फळीतल्या फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने ४ तर हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.

त्याआधी, कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांची धडाकेबाज शतकं आणि त्यांना डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत दिलेली उत्तम साथ या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन-डे सामन्यात ३७४ धावांपर्यंत मजल मारली . आयपीएल गाजवणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या गलथान कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. फिंचने ११४ तर स्मिथने १०५ धावांची खेळी केली.

कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानावर उतरत असलेल्या भारतीय गोलंदाजांची तयारी या सामन्यातून उघड झाली. सुरुवातीला बुमराह, शमी यांचा नेटाने सामना केल्यानंतर फिंच आणि वॉर्नर या जोडगोळीने मैदानावर स्थिरावत धावांचा वेग वाढवला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. अखेरीस मोहम्मद शमीने वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची जोडी फोडली. वॉर्नरने ६९ धावा केल्या. वॉर्नर माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथने फिंचला उत्तम साथ देत भारताला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

भारताच्या फिरकीपटूंनी स्मिथला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला खरा..परंतू तो यामध्ये फसला नाही. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत स्मिथने भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला. दुसऱ्या बाजूने कर्णधार फिंचने आपलं शतक साजरं केलं. परंतू बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ११४ धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्टॉयनिसकडून कांगारुंना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतू चहलने त्याला भोपळाही न फोडता माघारी धाडलं. यानंतर मैदानावर आलेल्या मॅक्सवेलने आपली जबाबदारी पूर्ण करत फटकेबाजीला सुरुवात करत ऑस्ट्रेलियाला स्मिथच्या साथीने त्रिशतकी धावसंख्या ओलांडून दिली. शमीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेलही माघारी परतला. यानंतर लाबुशेनही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मात्र यानंतर स्मिथने कॅरीच्या साथीने आपलं शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. मोहम्मद शमीच्या अखेरच्या षटकात स्मिथ बाद झाला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने ३ तर बुमराह-सैनी आणि चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

17:44 (IST)27 Nov 2020
पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजी, टीम इंडियावर ६६ धावांनी मात

झॅम्पचे ४ बळी, भारतीय संघाकडून शिखर धवन आणि हार्दिक पांड्याची एकाकी झुंज

17:37 (IST)27 Nov 2020
टीम इंडियाचा आठवा गडी माघारी

मोहम्मद शमी मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी

17:21 (IST)27 Nov 2020
टीम इंडियाच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांकडून निराशा

रविंद्र जाडेजा फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी, झॅम्पाने घेतला बळी. भारताला सातवा धक्का

17:09 (IST)27 Nov 2020
वन-डे क्रिकेटमध्ये पांड्याची सर्वोच्च धावसंख्येंची नोंद
17:02 (IST)27 Nov 2020
झॅम्पाच्या फिरकीत पुन्हा एकदा अडकला भारतीय खेळाडू, हार्दिक पांड्या माघारी

अखेरच्या षटकांत विजयासाठी आवश्यक असलेल्या धावाचं लक्ष्य वाढल्यानंतर हार्दिकची फटकेबाजी सुरु

झॅम्पाच्या गोलंदाजीवर षटकार हाणण्याच्या प्रयत्नात पांड्या सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी

७६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह पांड्याची ९० धावांची खेळी 

16:44 (IST)27 Nov 2020
भारताची जमलेली जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश

सलामीवीर शिखर धवन झॅम्पाच्या गोलंदाजीवर माघारी, ७४ धावांची खेळी करुन पांड्या बाद

पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये १२९ धावांची भागीदारी

16:22 (IST)27 Nov 2020
हार्दिक-शिखरची शतकी भागीदारी

टीम इंडियाने ओलांडला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा, शिखर-हार्दिक पांड्याची फटकेबाजी

15:51 (IST)27 Nov 2020
लागोपाठ शिखर धवनने झळकावलं अर्धशतक

भारताची जमलेली जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अपयश

मैदानावर तळ ठोकत शिखरचं अर्धशतक, भारताच्या आशा अजुनही पल्लवित

15:50 (IST)27 Nov 2020
हार्दिक पांड्याचं धडाकेबाज अर्धशतक, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर चढवला हल्लाबोल

झॅम्पा, स्टार्क यांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत पांड्याचं अर्धशतक

15:48 (IST)27 Nov 2020
हार्दिक पांड्या - शिखर धवन जोडीने सावरला भारताचा डाव

फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांची पाचव्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी

15:05 (IST)27 Nov 2020
भारतीय फलंदाजांची हाराकिरी सुरुच

लोकेश राहुल झॅम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मयांक, विराट आणि श्रेयस असे तीन बिनीचे शिलेदार माघारी परतलेले असतानाही राहुलकडून हाराकिरी

अवघ्या १२ धावा काढत स्मिथच्या हाती झेल देऊन राहुल बाद

14:55 (IST)27 Nov 2020
सिडनीत विराटच्या अपयशाची मालिका सुरुच
14:45 (IST)27 Nov 2020
टीम इंडियाच्या डावाला गळती, श्रेयस अय्यर स्वस्तात बाद

जोश हेजलवूडचा उसळता चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात अय्यर यष्टीरक्षक कॅरीकडे झेल देत बाद

आश्वासक सुरुवातीनंतर टीम इंडियाच्या डावाला खिंडार

14:43 (IST)27 Nov 2020
भारतीय संघाला मोठा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी परतला

जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर कर्णधाीर फिंचने घेतला विराटचा झेल, २१ धावा काढून विराट बाद

14:27 (IST)27 Nov 2020
विराट कोहलीचा झेल सुटला

भारतीय कर्णधार विराट कोहलीचा १ धावेवर झम्पाकडून कॅट सुटला. कमिन्सच्या उसळत्या चेंडूवर वॉनसाइडला चेंडू भिरकावणाऱ्या कोहलीचा झेल झम्पानं सोडला. विराट कोहलीचा झेल सुटल्यानंतर स्टेडिअममधील भारतीय चांहत्यांनी डान्स केला. सात षटकानंतर भारताच्या एक बाद ६४ धावा झाल्या आहेत. विराट कोहली ११ तर धवन २१ धावांवर खेळत आहेत. 

14:22 (IST)27 Nov 2020
भारताला पहिला धक्का; मयंक अग्रवाल बाद

३७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला ५३ धावांवर पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर मयंक अग्रवालला हेजलवुडनं २२ धावांवर बाद केलं. ६ षटकानंतर भारताच्या एक बाद ५४ धावा झाल्या आहेत. शिखर धवन १५ चेंडूत २१ धावांवर खेळत आहे.

14:17 (IST)27 Nov 2020
स्मिथच्या वादळाचा भारताला फटका, झळकावलं कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि स्मिथ यांच्या दमदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकांत ३७४ धावांचा डोंगर उभा केला आहे.

14:14 (IST)27 Nov 2020
धवन-मयंकाची तुफानी सलामी, भारताची आश्वासक सुरुवात

३७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघान आश्वासक सुरुवात केली आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि शिखर धवननं २५ चेंडूत नाबाद ५० धावांची अर्धशतकी भागिदारी केली आहे. मयंकनं १३ चेंडूत २१ धावा केल्या तर शिखर धवनने १४ चेंडूत २० धावा चोपल्या.

14:01 (IST)27 Nov 2020
टीम इंडियाला विजयासाठी करावे लागणार कष्ट

आकडेवारी ऑस्ट्रेलियाच्या बाजने...

13:25 (IST)27 Nov 2020
अखेरच्या षटकात फटकेबाजी करताना स्मिथ माघारी

मोहम्मद शमीने उडवला स्मिथचा त्रिफळा, १०५ धावा काढून स्मिथ बाद

६६ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह स्मिथची सिडनीच्या मैदानात तुफान फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाची ३७४ धावांपर्यंत मजल, भारतीय संघाला विजयासाठी ३७५ धावांचं आव्हान

13:23 (IST)27 Nov 2020
स्टिव्ह स्मिथची अखेरच्या षटकांत फटकेबाजी

भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत झळकावलं शतक

12:57 (IST)27 Nov 2020
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, लाबुशेन माघारी

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेवर असलेल्या शिखर धवनने घेतला सोपा झेल

अवघ्या २ धावा काढत लाबुशेन माघारी परतला

12:53 (IST)27 Nov 2020
फटकेबाजी करणारा ग्लेन मॅक्सवेल माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल सीमारेषेवर उभ्या असलेल्या रविंद्र जाडेजाच्या हातील झेल देऊन माघारी परतला. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये मॅक्सवेलने आपलं काम पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत १९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४५ धावा केल्या.

12:48 (IST)27 Nov 2020
भारतीय क्षेत्ररक्षकांनी निराशाजनक कामगिरी

अनेक झेल सोडले, गलथान फिल्डींगमुळे ऑस्ट्रेलियाला फायदा

12:47 (IST)27 Nov 2020
स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलची अखेरच्या षटकांत फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाने ओलांडला त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा, दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची काढली पिसं

12:42 (IST)27 Nov 2020
आयपीएलमध्ये अपयशी ठरलेल्या मॅक्सवेलला सूर गवसला

एकही षटकार लगावू न शकलेल्या मॅक्सवेलचा चहलवर हल्लाबोल

12:34 (IST)27 Nov 2020
विक्रमी शतकी खेळीसह फिंचने क्लार्क, स्मिथला टाकलं मागे
12:27 (IST)27 Nov 2020
टीम इंडियाला लागोपाठ दुसरं यश, मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

मार्कस स्टॉयनिस चहलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी

12:24 (IST)27 Nov 2020
शतकवीर फिंचला माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश

भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत फिंचचं धडाकेबाज शतक. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर खेळताना फिंच यष्टीरक्षक लोकेश राहुलकडे झेल देऊन माघारी परतला.

१२४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह फिंचची ११४ धावांची खेळी

12:17 (IST)27 Nov 2020
कर्णधार फिंचचं धडाकेबाज शतक, ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

स्टिव्ह स्मिथच्या सोबतीने फिंचची महत्वपूर्ण भागीदारी

12:12 (IST)27 Nov 2020
स्टिव्ह स्मिथचंही अर्धशतक, ऑस्ट्रेलियाचं सामन्यावर वर्चस्व

वॉर्नर माघारी परतल्यानंतर स्मिथने फिंचला उत्तम साथ देत झळकावलं अर्धशतक

टीम इंडिया सामन्यात बॅकफूटवर

11:58 (IST)27 Nov 2020
ऑस्ट्रेलियाने ओलांडला द्विशतकी टप्पा

वॉर्नर माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथची कर्णधार फिंचला भक्कम साथ

कांगारुंनी ओलांडला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा, सामन्यावर अजुनही यजमानांचं वर्चस्व कायम

11:27 (IST)27 Nov 2020
अखेरीस ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात भारतीय संघाला यश

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर बाद, भारतीय संघाने केलेलं अपिल पंचांनी फेटाळलं

विराट कोहलीचा DRS घेण्याचा निर्णय, तिसऱ्या पंचांनी केलेल्या पाहणीत बॉल बॅटला लागल्याचं उघड...डेव्हिड वॉर्नर माघारी

७६ चेंडूत वॉर्नरची ६ चौकारांसह ६९ धावांची खेळी, पहिल्या विकेटसाठी फिंच-वॉर्नरची १५६ धावांची भागीदारी

11:22 (IST)27 Nov 2020
भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी, सलामीची जोडी फोडण्यात टीम इंडियाला अपयश

कॅच पकडण्याचा शिखर धवनचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला??

11:20 (IST)27 Nov 2020
वन-डे क्रिकेटमध्ये भारताविरोधात फिंच-वॉर्नरची बहारदार कामगिरी

ही आकडेवारी पाहून तुम्हालाही बसेल विश्वास

11:18 (IST)27 Nov 2020
दौऱ्याच्या पहिल्याच सामन्याला वादाचं गालबोट

समालोचन करत असताना माजी खेळाडू गिलख्रिस्टकडून भारतीय खेळाडूच्या वडिलांच्या मृत्यूचा चुकीचा संदर्भ

सोशल मीडियावर चाहते खवळले, चूक लक्षात येताच गिलख्रिस्टने मागितली माफी. वाचा सविस्तर...

11:06 (IST)27 Nov 2020
डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक, सामन्यावर कांगारुंचं वर्चस्व

भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत वॉर्नरनेही झळकावलं अर्धशतक

टीम इंडियाचे गोलंदात हतबल, जोडी फोडण्याचे विराट कोहलीचे सर्व प्रयत्न फोल

10:51 (IST)27 Nov 2020
शतकी भागीदारीसह फिंच-वॉर्नर जोडीला मानाच्या पंगतीत स्थान

वन-डे क्रिकेटच्या इतिहासात फिंच-वॉर्नरची अकरावी शतकी भागीदारी

10:47 (IST)27 Nov 2020
कर्णधार फिंचचं अर्धशतक

सलामीच्या विकेटसाठी फिंचची डेव्हिड वॉर्नरसोबत शतकी भागीदारी

खेळपट्टीवर स्थिरावलवेल्या फिंचचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल

10:40 (IST)27 Nov 2020
कांगारुंची सलामीची जोडी फोडण्यात टीम इंडिया अपयशी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर दोनवेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजाविरोधात अपील, परंतू पंचांनी अपील फेटाळलं