अनुभवी रॉस टेलरचं धडाकेबाज शतक आणि त्याला हेन्री निकोलस व कर्णधार टॉम लॅथमने दिलेली भक्कम साथ या जोरावर न्यूझीलंडने भारतावर पहिल्या वन-डे सामन्यात मात केली आहे. ४ गडी राखून यजमान संघाने हा सामना जिंकला. भारताने विजयासाठी दिलेलं ३४८ धावांचं आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण करत, या दौऱ्यातल्या आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. रॉस टेलरने नाबाद १०९ धावा केल्या.
मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोलस यांनी संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केल्यानंतर गप्टील माघारी परतला. यानंतर टॉम ब्लंडलला झटपट माघारी धाडण्यातही भारत यशस्वी ठरला. दुसऱ्या बाजूने हेन्री निकोलसने मात्र भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत किल्ला लवढणं सुरु ठेवलं. निकोलस आणि कर्णधार लॅथम यांच्यात महत्वपूर्ण भागीदारीही झाली…मात्र विराटने दाखवलेल्या चपळाईमुळे निकोलस माघारी परतला, त्याने ७८ धावांची खेळी केली.
यानंतर टॉम लॅथम आणि रॉस टेलर यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताच्या हातातून विजय हिसकावून घेतला कर्णधार टॉम लॅथमनेही यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण केलं. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना कर्णधार लॅथम कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला…मात्र रॉस टेलरने एक बाजू लावून धरत आपलं शतकही पूर्ण केलं. टी-२० मालिकेप्रमाणे चमत्कार करणं भारतीय गोलंदाजांना जमलं नाही, रॉस टेलरने तळातल्या फलंदाजांना हाती घेऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी, मुंबईकर श्रेयस अय्यरचं धडाकेबाज शतक आणि त्याला कर्णधार विराट कोहली-लोकेश राहुलने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात ३४७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत हॅमिल्टनच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. एका क्षणाला संकटात सापडलेल्या भारतीय संघाने मोक्याच्या क्षणी भागीदारी रचण्यावर भर देत, मोठं आव्हान उभं केलं.
रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारताकडून मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी सलामीला मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र भारतीय सलामीवीरांना झटपट माघारी धाडण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. विराट कोहली इश सोधीच्या गोलंदाजीवर ५१ धावा काढून माघारी परतला.
यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल जोडीने पुन्हा एकदा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी १३६ धावांची भागीदारी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. श्रेयस अय्यरने यादरम्यान आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर अय्यर १०३ धावा काढून माघारी परतला. दरम्यान लोकेश राहुलनेही यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताला त्रिशतकी धावसंख्या ओलांडून देण्यासाठी मदत केली. लोकेश राहुलने नाबाद ८८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने २, कॉलिन डी-ग्रँडहोम आणि इश सोधीने १-१ बळी घेतला.
दोन धावा काढत असताना भारतीय क्षेत्ररक्षकाने केलेल्या अचूक थ्रो-मुळे डी-ग्रँडहोम बाद
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर उभ्या असलेल्या केदार जाधवकडे झेल देत निशम बाद
भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत टेलरची शतकी खेळी
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात गमावली विकेट
लॅथमची कर्णधारपदाला साजेशी खेळी, ४८ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह केल्या ६९ धावा
न्यूझीलंडची विजयी लक्ष्याकडे वाटचाल
ओलांडला २०० धावांचा टप्पा, यजमानांची लक्ष्याकडे वाटचाल
धाव घेताना झालेल्या गोंधळाचा फायदा घेत कर्णधार विराटने उडी मारत निकोलसला माघारी धाडलं
निकोलसची ८२ चेंडूत ११ चौकारांसह ७८ धावांची खेळी
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याचा ब्लंडलचा प्रयत्न फसला
संधी साधत लोकेश राहुलने ब्लंडलला यष्टीचीत करत भारताला मिळवून दिलं यश
भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करत निकोलसचं अर्धशतक
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर केदार जाधवने घेतला गप्टीलचा झेल
गप्टीलची ३२ धावांची खेळी, पहिल्या विकेटसाठी न्यूझीलंडच्या सलामीवीरांची ८५ धावांची भागीदारी
हेन्री निकोलस आणि मार्टीन गप्टील यांची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
न्यूझीलंडला विजयासाठी ३४८ धावांचं आव्हान
अखेरच्या षटकांमध्ये लोकेश राहुल आणि केदार जाधवची फटकेबाजी
लोकेश राहुलची फटकेबाजी, न्यूझीलंडचे गोलंदाज हतबल
टीम साऊदीच्या गोलंदाजीवर मिचेल सँटनरने घेतला अय्यरचा झेल
अय्यरची १०७ चेंडूत १०३ धावांची खेळी, शतकी खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश
लोकेश राहुलच्या साथीने अय्यरची धडाकेबाज फलंदाजी
श्रेयस अय्यरला उत्तम साथ देत, राहुलची आश्वासक खेळी
भारताने ओलांडला २७० धावसंख्येचा टप्पा
लोकेश राहुल - श्रेयस अय्यर जोडीची फटकेबाजी
कोहली माघारी परतल्यानंतर अय्यरने झळकावलं अर्धशतक, भारताची झुंज सुरुच
अर्धशतकवीर विराट इश सोधीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत
विराटची ६३ चेंडूत ५१ धावांची खेळी, अर्धशतकी खेळीत ६ चौकारांचा समावेश
श्रेयस अय्यरच्या साथीने विराटची संयमी फलंदाजी
न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत झळकावलं अर्धशतक
अर्धशतकी भागीदारी रचत ओलांडून दिला शतकी धावसंख्येचा टप्पा
टीम साऊदीच्या गोलंदाजीवर टॉम ब्लंडेलने घेतला झेल
३२ धावा काढत अग्रवाल माघारी परतला
पृथ्वी शॉ २० धावा काढत यष्टीरक्षक टॉम लॅथमकडे झेल देऊन माघारी
न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालकडून संयमाने सामना
केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम करतोय संघाचं नेतृत्व