दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीने सेंच्युरिअन कसोटीत १५३ धावांची शतकी खेळी करुन आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. एकीकडे भारतीय संघातले फलंदाज मॉर्ने मॉर्कल, कगिसो रबाडा, लुंगी निगडी, वर्नेन फिलँडर यांसारख्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर नांगी टाकत असताना, विराटने सेंच्युरिअन कसोटीत धडाकेबाज खेळी करत शतक ठोकलं. कोहलीचं कसोटी कारकिर्दीतलं हे २१ वं शतक ठरलं.

अवश्य वाचा – विराटच्या कर्णधारपदाच्या क्षमतेवर ग्रॅम स्मिथचं प्रश्नचिन्ह

वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकल होल्डींग यांच्यामते विराट कोहलीची ही कामगिरी त्याला सर्वोत्तम म्हणण्यासाठी पुरेशी नाही.”विराट कोहली माझा आवडता फलंदाज आहे. मला सर्वोत्तम ३ फलंदाजांची नाव विचारल्यास मी त्यामध्ये विराट कोहलीला जरुर स्थान देईन. मात्र ज्यावेळी विराट इंग्लंडमध्ये त्याच्या नेहमीच्या शैलीत धावा काढेल तेव्हाच मी त्याला सर्वोत्तम खेळाडू म्हणू शकेन.” मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत होल्डींग बोलत होते.

अवश्य वाचा – भक्त मोदींची करतात त्यापेक्षा जास्त हाजी हाजी BCCI कोहलीची करते – रामचंद्र गुहा

“कर्णधार म्हणूनही विराट कोहलीला अनेक बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. मला विराट कोहलीवर टिका करायला आवडत नाही, कारण त्याची शैली मला आवडते. मात्र प्रत्येकवेळा आक्रमक स्वभाव कामी येत नाही. काही वेळा तुम्हाला संघातल्या इतर अनुभवी खेळाडूंचा सल्ला घेणं गरजेचं असतं. मैदानात इतरांचा सल्ला विचारात घेणं गरजेचं आहे ही गोष्ट कोहलीला अजुनही नीटशी समजलेली दिसत नाही.” ज्यावेळी विराटमध्ये मला हे बदल दिसतील, त्याचवेळी मी त्याला सर्वोत्तम खेळाडू म्हणेन. विराटच्या खेळाबद्दल विचारलं असताना मायकल होल्डींग बोलत होते.

अवश्य वाचा – कसोटी पराभवाची बीसीसीआयकडून गंभीर दखल, क्रिकेट प्रशासकीय समिती चाचपणी करणार