विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. घरच्या मैदानावर खेळताना व परदेशातील काही सामन्यांमध्ये भारतीय संघाने आश्वासक कामगिरी केली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, विराट कोहलीचा भारतीय संघ गेल्या १०-१५ वर्षातला सर्वोत्तम संघ असल्याचं म्हटलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ याच्या मते सध्याच्या भारतीय संघ हा सर्वोत्तम आहे याची खात्री देता येत नाही. ESPNCricinfo संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत स्टिव्ह वॉ बोलत होता.

“मी माझ्या कारकिर्दीत सर्वोत्तम अशा भारतीय संघाविरुद्ध खेळलो आहे. त्यामुळे सध्याचा भारतीय संघ हा सर्वोत्तम आहे हे मी सांगू शकणार नाही. रवी शास्त्री यांना आपल्या संघाचं धैर्य वाढवायचं आहे म्हणून त्यांनी कदाचीत आपल्या संघाला सर्वोत्तम म्हटलं असेल. पण मला वैय्यक्तीक कोणत्याही संघाची तुलना करणं योग्य वाटत नाही, कारण असं करण्यामुळे संघावर दबाव वाढू शकतो, आणि असं झाल्यानंतर पुन्हा त्या संघाला टीकेचा सामना करावा लागतो.” स्टिव्ह वॉने आपलं मत मांडलं.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्याविषयी स्टिव्ह वॉला विचारलं असताना तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात देशात हरवणं कठीण आहे. ऑस्ट्रेलियाकडे गोलंदाजांची चांगली फौज आहे. जर आमच्या फलंदाजांनी पहिल्या डावात ३५० पेक्षा जास्त धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाला हरवणं कठीण जाईल. मात्र ही मालिका नक्कीच रंगतदार होईल.” २१ नोव्हेंबरपासून पहिल्या टी-२० सामन्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेला सुरुवात होणार आहे.