भारतीय संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्या सामन्यात रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला होता. पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने उपयुक्त खेळी केली. त्याने ४४ चेंडूत ४२ धावा केल्या. त्यात रोहितने सहा चौकारांची आतषबाजी केली. त्याचपैकी एक चौकार त्याने अतिशय वेगळ्या प्रकारे लगावला. १३ व्या षटकात केन रिचर्डसन गोलंदाजी करत होता. त्याने रोहितला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. रोहितने पायांचा अप्रतिम वापर केला आणि एक झकास चौकार लगावला. रोहितने चेंडूच्या उसळीचा अचूक अंदाज घेतला.

हा पाहा व्हिडीओ –

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात राजकोटच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि शिखर धवन या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकी भागीदारी केली. या सामन्यात रोहित शर्माने वन-डे क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने आणखी एका विक्रमाची नोंद केली. सलामीवीर या नात्याने रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. १३७ डावांमध्ये रोहितने ही कामगिरी केली. आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमलाचा विक्रम या वेळी रोहितने मोडला.