इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ

न्यूझीलंडकडून ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असा दारुण पराभव व त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात पदरी पडलेली निराशा विसरून सोमवारपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याद्वारे पुन्हा एकदा विजयपथावर परतण्यासाठी महिला संघ सज्ज झाला आहे.

हरमनप्रीत कौरने दुखापतीमुळे या मालिकेतूनदेखील माघार घेतली असल्याने स्मृती मानधनाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. स्मृतीव्यतिरिक्त अनुभवी मिताली राज आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मदार आहे. ३६ वर्षीय मितालीची कदाचित ही मायदेशातील अखेरची ट्वेन्टी-२० मालिका असू शकते. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या वेदा कृष्णमूर्तीवरदेखील सर्वाच्या नजरा आहेत.

झुलन गोस्वामीने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यापासून शिखा पांडे गोलंदाजीचे नेतृत्व प्रभावीपणे करत असून तिला अरुंधती रेड्डीची साथ लाभेल. फिरकीची भिस्त पुन्हा एकदा पूनम यादव, एकता बिश्त व दीप्ती शर्मा या त्रिकुटावर असणार आहे.

मानसी जोशीच्या अनुपस्थितीत कोमल झांझडला पदार्पणाची संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. त्याशिवाय हर्लिन देओल, भारती फुलमाळी यांनादेखील संघ व्यवस्थापन आजमावू शकते.

संघ

  • भारत : स्मृती मानधना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), भारती फुलमाळी, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल झांझड, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हर्लिन देओल.
  • इंग्लंड : हीदर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमाँट, कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, सोफिया ब्राऊन, जॉर्जिया एल्व्हिस, अ‍ॅमी जोन्स, फ्रेया डेव्हिस, नताली शिव्हर, लॉरा मार्श, अन्या श्रुबसोल, लिन्से स्मिथ, लॉरेन विनफिल्ड, डॅनिएल, अ‍ॅलेक्स हार्टले.
  • सामन्याची वेळ : सकाळी ११ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १