England vs India 2nd Test : इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताची पूर्णतः दाणादाण उडाली. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे भारताचा डाव १०७ धावांत आटोपला. अँडरसनने २० धावा देऊन ५ बळी टिपले. वोक्सने २, कुरानने १, ब्रॉडने १ बळी टिपला. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

लॉर्ड्सच्या मैदानावर कालपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार होता. मात्र पावसाच्या सततच्या अडथळ्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून मुरली विजय (०) आणि लोकेश राहुल (८) हे दोघेही सलामीवीर झटपट बाद झाले. दोनही बळी अँडरसननेच टिपले. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला होता आणि वेळेआधीच ‘लंच ब्रेक’ घेण्यात आला होता. त्यानंतर खेळाला पुन्हा सुरूवात झाली आहे. केवळ २ षटकांचा खेळ झाला. त्यातच चेतेश्वर पुजारा (१) धावचीत झाला आणि पावसामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. अखेर चहापानानंतर आता पुन्हा सामन्याला सुरूवात झाली आहे. काही काळ संयमी खेळ केल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार विराट कोहली २३ धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ हार्दिक पांड्याही ११ धावांवर बाद झाला. दोनही बळी ख्रिस वोक्स यानेच घेतले. त्यानंतर दिनेश कार्तिकदेखील (१) त्रिफळाचित झाला. गेल्या सामन्यातील सामनावीर कुरान याने त्याला बाद केले. अश्विनने काही काळ रहाणेला साथ दिली. पण अँडरसनच्या गोलंदाजीवर रहाणेलाही तंबूत परतावे लागले. रहाणेने १८ धावा केल्या. रहाणेनंतर अश्विन (२९) आणि कुलदीप यादवही (०) बाद झाले. अखेर इशांत शर्माच्या (०) रूपाने भारताचा दहावा गडी बाद झाला.

कालही सामना सुरू होण्यास विलंब झाला असल्याने पहिल्या दिवशी नाणेफेकीआधीच खेळाडूंना लंच ब्रेक घ्यावा लागला होता. त्यानंतर चहापानाची विश्रांतीदेखील घेण्यात आली होती. अखेर काल स्थानिक वेळेनुसार ४ वाजून ४५ मिनिटांनी पहिल्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती ICCने दिली होती.

हा आहे भारतीय संघ –

हा आहे इंग्लंडचा संघ –

Live Blog

23:51 (IST)10 Aug 2018
भारताचा १०७ धावांत खुर्दा; अँडरसनचे ५ बळी

भारताचा डाव १०७ धावांत आटोपला. इशांत शर्माला पायचीत करत अँडरसनने डावात ५ बळी टिपले.

23:42 (IST)10 Aug 2018
भारताला नववा धक्का, अश्विन तंबूत, भारत ९ बाद ९६

भारताची धूळधाण उडाली असून अश्विनही पायचीत झाला. स्टुअर्ट ब्रॉडने त्याला बाद केले. अश्विनने २९ धावा केल्या.

23:39 (IST)10 Aug 2018
भारताला आठवा धक्का, कुलदीप यादव पायचीत

भारताला कुलदीप यादवच्या रूपात आठवा धक्का बसला. तो पायचीत झाला. अँडरसनचा डावातील हा ४था बळी ठरला. 

23:22 (IST)10 Aug 2018
भारताच्या संकटात वाढ; अजिंक्य रहाणे माघारी

भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला अँडरसन याने बाद केले. हा अँडरसनचा डावातील तिसरा बळी ठरला. 

23:16 (IST)10 Aug 2018
दिनेश कार्तिक त्रिफळाचित; भारताची अवस्था ६ बाद ६२

मागच्या सामन्यातील सामनावीर कुरान याने कार्तिकला बाद केले. कार्तिक गेल्या सामन्यातही अशा पद्धतीच्या चेंडूवर बाद झाला होता.

22:51 (IST)10 Aug 2018
विराटपाठोपाठ हार्दिक बाद; भारताचा निम्मा संघ तंबूत

विराट कोहली बाद झाल्यांनतर हार्दिक पंड्यादेखील लगेच बाद झाला. वोक्सने त्यालाही स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. हार्दिकने ११ धावा केल्या. त्यामुळे भारताची आवस्था ५ बाद ६२ अशी झाली आहे.

22:38 (IST)10 Aug 2018
भारताला मोठा धक्का; कर्णधार कोहली २३ धावांवर बाद

पहिल्या सामन्याच्या दोनही डावात चांगली खेळी करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली २३ धावा काढून बाद झाला. ख्रिस वोक्स याने त्याला स्लिपमध्ये झेलबाद होण्यास भाग पाडले.

21:42 (IST)10 Aug 2018
दीर्घ विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात; कोहली-रहाणे जोडी मैदानात

दुसऱ्या दिवशीही पावसाच्या जोरदार बॅटिंगनंतर अखेर पावसाने विश्रम घेतला आहे. त्यामुळे दीर्घ विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झाली असून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हि जोडी मैदानात आहे.

16:08 (IST)10 Aug 2018
विजय मागोमाग लोकेश राहुल बाद, पावसामुळे खेळ थांबला

मुरली विजयनंतर लोकेश राहुलही बाद झाला असून अँडरसन याने दुसरा बळी टिपला आहे. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आला आहे.

15:46 (IST)10 Aug 2018
भारताला पहिला धक्का, मुरली विजय शून्यावर बाद

दुसऱ्या दिवशी खेळाला सुरुवात झाली असून पहिल्याच षटकात भारताला धक्का बसला. जेम्स अँडरसन याच्या आऊट स्विंग झालेल्या चेंडूवर मुरली विजय शून्यावर त्रिफळाचित झाला.