तीन सामने जिंकत भारताने एकदिवसीय मालिका जिंकली असली तरी निभ्रेळ यश आता त्यांना साद घालत आहे. १९९०मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध त्यांच्या भूमीवर अखेरची मालिका जिंकली होती. भारताने त्यानंतर २००२ साली नॅटवेस्ट करंडक आणि २०१३चा आयसीसी चॅम्पियन्स करंडक उंचावला होता, पण त्या वेळी दोनपेक्षा जास्त संघांची स्पर्धा होती. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनी भारताला मालिकेत निभ्रेळ यशाची संधी असून धोनी ब्रिगेडही या ऐतिहासिक मालिका विजयासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे अखेरचा ‘पंच’ मारून भारत ऐतिहासिक मालिका जिंकणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाचे या मालिकेत पानिपत झालेले आहे. तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. मालिका हातातून निसटली असली तरी अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याची इंग्लंडला अखेरची संधी असेल.
भारताने मालिका जिंकली असल्याने त्यांना या सामन्यात गमावण्याचे कसलेही दडपण नसेल. त्यामुळे या सामन्यात राखीव खेळाडूंना मैदानात उतरवण्याची आणि त्यांना आजमावण्याची भारताला नामी संधी असेल. त्यामुळे करण शर्मा आणि उमेश यादव यांना संघात स्थान मिळू शकेल. अजिंक्य रहाणेने गेल्या सामन्यामध्ये तडफदार शतक झळकावल्याने त्याला सलामीला कायम ठेवण्यात येईल. याचप्रमाणे शिखर धवननेही नाबाद ९७ धावांची खेळी साकारत आपली बॅट अद्याप तळपत असल्याचे दाखवून दिले आहे. सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात आहेत. गोलंदाजांकडूनही अपेक्षित कामगिरी होत असली तरी त्यामध्ये सुधारणेला वाव आहे.
भारताच्या तुलनेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर इंग्लंडचा संघ नापास ठरला आहे. कर्णधार अॅलिस्टर कुकने पराभवाचे खापर निवड समितीवर फोडले आहे. मोइन अली आणि जेम्स ट्रेडवेल हे एकाच संघात खेळणे कुकला रुचले नसल्याचे बोलले जात आहे. कुकला स्वत:ला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. इयान बेल, ईऑन मॉर्गन, मोइन अली, जेम्स अँडरसन यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अॅलेक्स हेल्स, गॅरी बॅलन्स, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, यांनाही छाप पाडता आलेली नाही.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, मुरली विजय, करण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, धवल कुलकर्णी आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड : अॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टिव्हन फिन, हॅरी गुर्ने, अॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, इऑन मॉर्गन, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल आणि ख्रिस वोक्स.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-१ वाहिनीवर
वेळ : दुपारी ३.०० वा.पासून.