भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडत भारताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर अक्षरने इंग्लंडचा सलामीवीर डॉमिनिक सिब्ले याला त्रिफळाचीत केलं. तो फक्त दोन धावा करु शकलाय यानंतर सिब्लेच्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर जॅक क्रॉले यालाही अक्षरने मोहम्मद सिराजच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं. अक्षरला मिळालेल्या या दुसऱ्या विकेटमध्ये ऋषभ पंतचाही वाटा होता.

आठव्या ओव्हरमध्ये क्रॉले चौकार मारण्यासाठी पुढे आला होता. यानंतर ऋषभ पंतने कोणीतरी खूप चिडलंय म्हणत क्रॉलेला चिडवण्यास सुरुवात केली. पुढच्याच चेंडूवर क्रॉलेने पुन्हा एकदा पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट मोहम्मद सिराजच्या हातात देऊन झेलबाद झाला.

दरम्यान इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. तर, इंग्लंडचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला असून जोफ्रा आर्चर आणि स्टुर्अट ब्रॉडला संघात जागा मिळालेली नाही. फलंदाजी भक्कम करण्यासाठी इंग्लंडने डॅनियल लॉरेन्सला संघात स्थान दिलंय, तर स्पिनर डोमिनिक बेस यालाही अखेरच्या कसोटीत संधी मिळाली आहे. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजीचा भार जेम्स अँडरसन, बेस आणि लीच यांच्यावर असेल. शिवाय, अष्टपैलू बेन स्टोक्स देखील गोलंदाजी करताना दिसेल.

दरम्यान, मोटेराच्या अनुकूल खेळपट्टीवर गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटीत फिरकीच्या बळावर वर्चस्व गाजवून इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्यापेक्षा लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे लक्ष्य असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे सध्या २-१ अशी आघाडी असून, जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंडला भिडण्यासाठी अखेरची कसोटी किमान अनिर्णीत राखण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यासाठी थेट पात्र ठरेल.