टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २२ धावांनी मात करत वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २७४ धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने फटकेबाजी करत चांगली झुंज दिली…पण त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.
पहिल्या वन-डे प्रमाणे दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने सर्वप्रथम शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र अखेच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात भारताने विकेट फेकत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. जाडेजाने ५५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही या सामन्यात ५२ धावा केल्या. याव्यतिरीक्त इतर फलंदाज अपयशी ठरले.
त्याआधी, रॉस टेलर आणि कायन जेमिन्सन यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात २७३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत ऑकलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये न्यूझीलंडने फटकेबाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभी केलीच. युजवेंद्र चहल-शार्दुल ठाकूर जोडगोळीने मधल्या फळीत दमदार मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावला. मोक्याच्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केली, ज्याचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व स्थापन केलं.
नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केल्यानंतर चहलने निकोल्सला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर शार्दुल ठाकूरने टॉम ब्लंडलला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला.
मार्टीन गप्टीलने रॉस टेलरसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गप्टीलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूरच्या अचूक थ्रो-वर गप्टील धावबाद झाला. त्याने ७९ धावांची खेळी केली. यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. अखेरीस अनुभवी रॉस टेलरने कायल जेमिन्सनच्या साथीने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. टेरलच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने २७३ धावांचा टप्पाही गाठला. रॉस टेलरने नाबाद ७३ धावांची खेळी केली. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, शार्दुल ठाकूरने २ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.
२२ धावांनी न्यूझीलंडने जिंकला सामना, मालिकेतही २-० ने विजयी आघाडी
रविंद्र जाडेजाची ५५ धावांची खेळी
भारताला नववा धक्का
अखेरच्या षटकांमध्ये रविंद्र जाडेजाची झुंज सुरुच
जमलेली जोडी फोडण्यात न्यूझीलंडला यश
जेमिन्सनच्या गोलंदाजीवर सैनी त्रिफळाचीत, सैनीची फटकेबाजी करत ४५ धावांची खेळी
आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत सामन्यात रंगत
१८ धावा काढून शार्दुल त्रिफळाचीत, भारताला सातवा धक्का
हमिश बेनेटच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टॉम लॅथमने घेतला झेल
अय्यरची ५७ चेंडूत ५२ धावांची खेळी
रविंद्र जाडेजाच्या साथीने संघाचा डाव सावरत अय्यरची अर्धशतकी खेळी
टीम साऊदीच्या गोलंदाजीवर केदार बाद, शंभर धावांच्या आतच टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी
कॉलीन डी-ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर राहुल बाद, भारताचा चौथा गडी माघारी
टीम साऊदीच्या गोलंदाजीवर कोहली त्रिफळाचीत, भारताचा तिसरा गडी माघारी
कोहलीने केल्या केवळ १५ धावा
कायल जेमिन्सनने घेतला बळी, २४ धावा काढून पृथ्वी शॉ बाद
हमिश बेनेटच्या गोलंदाजीवर रॉस टेलरने घेतला झेल, अवघ्या ३ धावा काढत अग्रवाल बाद
भारताला विजयासाठी २७४ धावांचं आव्हान
न्यूझीलंडची आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल
युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर नवदीप सैनीने घेतला झेल
दरम्यान न्यूझीलंडने ओलांडला द्विशतकी धावसंख्येचा टप्पा
युजवेंद्र चहलने स्वतःच्या गोलंदाजीवरच घेतला झेल
अखेरच्या फळीतल्या फलंदाजांकडून निराशा
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरने घेतला झेल
न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी, रविंद्र जाडेजाने सुरेख चपळाई दाखवत निशमला केलं धावबाद
रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर लॅथम पायचीत, यजमानांना चौथा धक्का
शार्दुल ठाकूरच्या अचूक थ्रो-मुळे गप्टील माघारी
गप्टीलची ७९ चेंडूत ७९ धावांची खेळी, अर्धशतकी खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश
मार्टीन गप्टीलची झुंज सुरुच
टॉम ब्लंडल नवदीप सैनीच्या हाती झेल देत माघारी, ब्लंडलच्या २२ धावा
न्यूझीलंडची आश्वासक सुरुवात, ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा
हेन्री निकोल्स पायचीत होऊन माघारी, पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांच्या निर्णयाला न्यूझीलंडकडून आव्हान
तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही निकोल्स बाद असल्याचं स्पष्ट, ४१ धावा करुन निकोल्स बाद
१० षटकांत ओलांडला अर्धशतकी धावसंख्येचा टप्पा
गुप्टील आणि निकहोल्स या न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांनी सावध सुरुवात केली आहे. शार्दुल ठाकूर आणि बुमराह टिच्चून गोलंदाजी करत आहेत.