कर्णधार सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत प्रेक्षकांनी अंधेरी क्रीडा संकुलावर खेळल्या गेलेल्या लढतीत मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावली होती. याचा प्रत्यय गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीतही येणार आहे. आंतरखंडीय फुटबॉल लढतीत गुरुवारी भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे आणि याही लढतीची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

दहा हजार क्षमता असलेल्या अंधेरी क्रीडा संकुलात सोमवारी जवळपास नऊ हजार प्रेक्षक उपस्थित होते आणि त्यांच्या पाठिंब्याने भारावलेल्या भारतीय संघाने केनियावर ३-० असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला नमवून सातत्य राखण्याचा निर्धार भारतीय संघाने केलेला आहे. त्यात न्यूझीलंडही विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी आतुर असल्याने या लढतीत कमालीची चुरस अनुभवायला मिळणार आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स