भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स करंडकाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू खास आपल्या शैलीत यावर भाष्य केले आहे. आज भारत पाकिस्तानसोबतचा सामना जिंकला तर आपण गंगेत न्हालो आणि सगळी पापं धुतली गेली असं समजायला हरकत नाही. त्यामुळे सिध्दू यांच्या वक्तव्यामुळे हा विषय भावनिकरित्या जोडला जात असल्याचे पहायला मिळत आहे.

पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री सिध्दू म्हणाले, आजचा क्रिकेट सामना हा भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचा विषय भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याबाबत अतिशय उत्सुकता असल्याने केवळ भारत आणि पाकिस्तानध्येच नाही तर बर्मिंगहममध्येही या सामन्याविषयी विशेष उत्कंठा आहे. सामन्याचे स्टेडियम पूर्णपणे भरलेले असेल असा अंदाजही सामन्याच्या आधीच अनेकांकडून वर्तविण्यात आला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीच्या लढतीसाठी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली होती. शिखर धवनसह कोहली, राहणे, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून फलंदाजीच्या उत्तम अपेक्षा आहेत. भारतीयांच्या नजरा आज या सामन्यावर असून कोणत्या संघाची सरशी लागेल याबाबत प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता आहे.