विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. फॉलो-ऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. १९१ धावांवर दुसरा डाव संपवत भारताने सामना जिंकला आणि घरच्या मैदानावर भारतीय संघाने विक्रमी सलग ११ वा कसोटी मालिका विजय ठरला.

आफ्रिकेच्या संघाला दोनही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. नवल म्हणजे या पराभवाचे खापर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने खराब दर्जाचे हॉटेल्स आणि जेवण यावर फोडलं. भारतात मिळत असलेल्या पाहुणचारावर आफ्रिकेचा डीन एल्गर याने भाष्य केलं. “आशियाई उपखंडात खेळणं हे नेहमी आव्हानात्मक असते. पण येथील आम्हाला मिळालेली हॉटेल्स ही खराब दर्जाची आणि छोटी आहेत. तसेच भारतीय जेवणामुळे येथील वातावरणाशी जुळवून घेण्यास अत्यंत अडचण येत आहे. त्यामुळे खेळाडू आणि व्यक्ती म्हणून हा दौरा खूप थकवणारा ठरला”, असे सांगत एल्गरने पराभवाचे खापर या साऱ्या गोष्टींवर फोडले.

दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला रांची येथे सुरुवात झाली. या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देणार होते. मात्र शुक्रवारी सरावादरम्यान कुलदीपच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले. यासाठी निवड समितीने खबरदारीचा उपाय म्हणून शाहबाज नदीमला भारतीय संघात स्थान दिले. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा शाहबाज नदीम २९६ वा खेळाडू ठरला.