भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

हनुमा विहारीने (नाबाद १००) साकारलेल्या कारकीर्दीतील पहिल्या शतकाच्या बळावर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ७ बाद ३९० अशी मजल मारली होती. पहिल्या दिवशी सलामीवीर मयांक अगरवाल (५५) आणि कर्णधार विराट कोहली (७६) यांनी अर्धशतके झळकावली.

दुसऱ्या दिवशी ५ बाद २६४ धावसंख्येवरून भारताने पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन होल्डरने ऋषभ पंतचा (२७) त्रिफळा उडवला. त्याने विहारीसोबत सहाव्या गडय़ासाठी ६२ धावांची भागीदारी केली. परंतु ४२ धावांवर डावाला पुढे सुरुवात करीत विहारीने आत्मविश्वासाने खेळ केला. त्याने होल्डरला चौकार खेचून ९६ चेंडूंत अर्धशतक साकारले. विहारीने जडेजाच्या (६९ चेंडूंत १६ धावा) साथीने सातव्या गडय़ासाठी १० षटकांत ३८ धावांची भागीदारी रचली. रहकीम कॉर्नवॉलने ही जोडी फोडण्यात यश मिळवले. मिडऑनला डॅरेन ब्राव्होने जडेजाचा झेल टिपला. मग कॉर्नवॉलच्याच गोलंदाजीवर विहारीला पहिल्या स्लीपमध्ये जॉन कॅम्पबेलने जीवदान दिले. त्यानंतर, विहारीने इशांत शर्माच्या साथीने आठव्या गडय़ासाठी जोडी जमवली.

पहिल्या दिवशी अगरवाल बाद झाल्यानंतर कोहलीने अजिंक्य रहाणेसह (२४) चौथ्या गडय़ासाठी ४९ धावांची भागीदारी केली. अखेरच्या सत्रात कोहली आणि आणि रहाणे हे महत्त्वाचे फलंदाज बाद करण्यात वेस्ट इंडिजला यश आले. कोहलीने १६३ चेंडू मैदानावर टिकाव धरत १० चौकारांसह ७६ धावांची खेळी साकारली.

आव्हानात्मक खेळपट्टीवर समाधानकारक मजल – मयांक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी आव्हानात्मक खेळपट्टीवर भारताने समाधानकारक मजल मारली आहे, असे मत सलामीवीर मयांक अगरवालने व्यक्त केले. भारताने ५ बाद २६४ अशी मजल मारली. यात मयांकने कारकीर्दीतील तिसरे कसोटी अर्धशतक साकारताना केलेल्या ५५ धावांचा महत्त्वाचा वाटा होता. या खेळीबाबत मयांक म्हणाला, ‘‘खेळपट्टी आणि वातावरण आव्हानात्मक होते. पहिल्या सत्रात गोलंदाजांना खेळपट्टीची अप्रतिम साथ मिळाली. केमार रोच आणि जेसन होल्डर यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. परंतु अशा खेळपट्टीवर दिवसभरात फक्त पाच फलंदाज गमावणे, हे सोपे नाही.’’ विंडीजचा पदार्पणवीर रहकीम कॉर्नवॉलने ९० षटकांपैकी २७ षटके टाकली आणि ६९ धावा देते चेतेश्वर पुजाराचा महत्त्वाचा बळी मिळवला. त्याच्या गोलंदाजीचे मयांकनेही कौतुक केले.