भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी क्वालालंपूर येथे सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पध्रेतील अंतिम फेरीत प्रवेशासह भारतीय संघान चॅम्पियन्स गटात स्थान पटकावले होते.

महिला संघाने लक्झेंबर्ग संघावर ३-१ असा विजय मिळवला तर पुरुष संघाने ब्राझीलवर ३-२ अशी मात केली. महिला संघाने आठही लढतीत अपराजित राहत सुवर्णपदकाची कमाई केली.  महिला गटाच्या अंतिम लढतीत मौमा दासने डॅनियल कोंन्सब्रुकवर ३-० असा विजय मिळवला. मनिका बात्राने टेसी गोंडरिजरला ३-१ असे नमवले. के. शामिनीला सारा डी न्यूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र परतीच्या लढतीत मनिकाने डॅनियलाचा ३-० असा पराभव करीत संघाच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

पुरुषांच्या अंतिम लढतीत सौम्यजीत घोषला सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या लढतीत हरमीतने विजय मिळवला. थिआगो माँटेरोने अँथनी अमलराजचा २-१ असा पराभव केला. हरमीतने कॅझुओ मात्सुमोटोवर थरारक विजय मिळवला.