बॉक्सिंग इंडियामध्ये नेमके काय सुरू आहे याचा सुगावा पदाधिकाऱ्यांनाही लागत नसून संघटनेमध्ये पुन्हा धुसफुस सुरू असल्याचे दिसून येत आहे. महासंघाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांनी नवी दिल्ली येथे गुरुवारी कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. मात्र संघटनेचे सरचिटणीस जय कवळी यांच्यासह वीस सदस्यांपैकी सोळा सदस्यांनी त्यावर बहिष्कार घालण्याचे ठरविले असल्याचे समजते.
जजोदिया यांनी बोलाविलेल्या बैठकीला आपण तांत्रिक कारणास्तव सहभागी होऊ शकत नाही असे सोळा सदस्यांनी कळवले असल्याचे समजते. त्यामुळे दडपणाखाली आलेले जजोदिया हे बैठकीपूर्वीच पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
कार्यकारिणीच्या एका वरिष्ठ सदस्याने ही बैठक घटनात्मक तरतुदीनुसार आयोजित करण्यात आलेली नसल्याचे सांगितले. ही बैठक आयोजित करण्याची जबाबदारी कवळी यांच्याकडे आहे. पण असे असतानाही अध्यक्षांनी ही बैठक आयोजित करण्याचे प्रयोजन कळत नाही. जजोदिया व कवळी यांच्यात सुसंवाद राहिलेला नाही.
जजोदियांनी आयोजित केलेल्या बैठकीबाबत कवळी हे अनभिज्ञ असल्याचे समजते. आशियाई बॉक्सिंग महासंघाला पाठविलेल्या पत्रावर कवळी यांनी आपली खोटी स्वाक्षरी कवळी होती. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे असे जजोदिया यांनी कवळी यांना कळविले असल्याचे समजते.