News Flash

ध्वज विजयाचा उंच धरा रे!

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर भारतीय संघ आता इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच इंग्लंडच्या आजी-माजी खेळाडूंनीसुद्धा भारतीय खेळाडूंना कौतुकाच्या नशेत धुंद ठेवण्याचा पवित्रा अवलंबला आहे.

सैजन्य – लोकप्रभा

ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर भारतीय संघ आता इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. त्या पाश्र्वभूमीवर दोन्ही संघांची बलस्थाने आणि कमकुवत बाजूंचा घेतलेला आढावा..

‘ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारत ०-४ अशा फरकाने गमावेल’, ‘विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकही सामना जिंकता येणार नाही’, ‘भारतीय संघामध्ये कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असलेली खडूस फलंदाजी व जिद्द दिसत नाही’.. अशा आशयाची मते १९ डिसेंबर, २०२० रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर व्यक्त झाली. अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांत चाहत्यांपासून माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वाचाच समावेश होता. परंतु बरोबर एका महिन्यानंतर म्हणजेच १९ जानेवारी, २०२१ रोजी भारताने हे सर्व दावे फोल ठरवून ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे नेस्तनाबूत केले.

या पराक्रमाचे पडसाद संपूर्ण जगभर उमटले. त्यामुळेच आता भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच इंग्लंडच्या आजी-माजी खेळाडूंनीसुद्धा भारतीय खेळाडूंना कौतुकाच्या नशेत धुंद ठेवण्याचा पवित्रा अवलंबला आहे. जेणेकरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाचा आनंद साजरा करण्यात भारताचे खेळाडू मग्न राहतील व इंग्लंडला त्याचा फायदा उचलता येईल.

आता थेट विषयालाच हात घालू. येत्या ५ फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तुल्यबळ संघांची गणना केल्यास इंग्लंडचा क्रमांक नक्कीच पहिल्या दोघांत येईल. यंदा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल भारतात खेळवली जाण्याची शक्यता असल्याने या मालिकेच्या आयोजनाद्वारे भारतामध्ये जैवसुरक्षित वातावरण कशा प्रकारे निर्माण करता येईल, हे पाहणे रंजक ठरेल.

करोनामुळे गाजलेले २०२० हे वर्ष अनेकांसाठी निराशाजनक ठरलेले असताना भारताचा पुरुष क्रिकेट संघ त्याला कसा अपवाद राहील? ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यापूर्वीच भारतीय संघाला दुखापतींचे ग्रहण लागले होते. ‘आयपीएल’च्या धुंदीतून पूर्णपणे न सावरलेल्या भारताला एकदिवसीय मालिकेत कांगारूंनी २-१ अशी धूळ चारली. परंतु भारताने पलटवार करताना ट्वेन्टी-२० मालिकेवर २-१ असा कब्जा केला. त्यामुळे प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर करंडक म्हणजेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले गेले. या मालिकेतसुद्धा भारताच्या अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे खेळता आले नाही. कर्णधार विराट कोहलीने पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तर इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमरा यांना चौथी कसोटी येईपर्यंत विविध दुखापतींमुळे माघार घ्यावी लागली. तरीही भारताने शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, टी नटराजन या दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह मालिका विजय साकारला. या यशानंतर भारतीय खेळाडूंचे मायदेशी जल्लोषात स्वागतही झाले.

आगामी इंग्लंड दौऱ्याच्या दृष्टीने भारतासाठी सकारात्मक बाब म्हणजे यांपैकी बहुतेक खेळाडू संघात परतले आहेत. फलंदाजीत कोहलीच्या येण्याने सुदृढता निर्माण झाली असून सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व मयांक अगरवाल यांना प्रथम पसंती मिळण्याची शक्यता आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मधल्या फळीत संघाची जबाबदारी घेतील. भारतीय खेळपट्टय़ांवर फिरकीपटूंना मदत मिळत असल्याने यष्टीरक्षक तितकाच परिपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गाजवणाऱ्या पंतला संघाबाहेर बसवून अनुभवी वृद्धिमान साहाला अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोलंदाजांच्या फळीचा विचार केल्यास भारत या मालिकेतसुद्धा पाच गोलंदाजांसह उतरेल. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याने रविचंद्रन अश्विनच्या साथीने कुलदीप यादवला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु संघ व्यवस्थापनाने अष्टपैलूला प्राधान्य दिल्यास हार्दिक पंडय़ा व वॉशिंग्टन सुंदर यांच्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजांची भूमिका बजावतील. एकंदर या मालिकेसाठी तरी भारताचा सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ सज्ज दिसत असल्याने इंग्लंडला यंदा कडवा संघर्ष करावा लागणार, हे निश्चित.

जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने काही दिवसांपूर्वीच झालेल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला २-० अशी धूळ चारून भारत दौऱ्यासाठी आपण सज्ज असल्याचे जाहीर केले. बेन स्टोक्स, जोफ्रा आरचर या आघाडीच्या खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने त्यांची ताकद दुप्पट झाली आहे. इंग्लंडची मदार प्रामुख्याने जॅक लीच आणि डॉम बेस या फिरकीपटूंवर असून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही अनुभवी वेगवान जोडी कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजांना हैराण करू शकते. रूट आणि स्टोक्स सोडल्यास इंग्लंडच्या फलंदाजीत अनुभवाचा अभाव आढळतो. परंतु तरीही त्यांना कमी लेखणे जोखमीचे ठरू शकते.

सध्या भारतीय संघ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी नसला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशानंतर चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांना त्यांच्याच भूमीत तोडीसतोड झुंज देण्याची क्षमता भारतात असल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपदही आपल्याला पटकावण्याची नामी संधी आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजयाचा ध्वज उंच ठेवण्याच्या इराद्याने भारतीय खेळाडूंनी मैदानात उतरावे व २०१८-१९मध्ये पत्करलेल्या पराभवाची परतफेड करावी, अशीच अपेक्षा तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. तसेच येत्या काळात भारतीय संघ क्रिकेटच्या या सर्वाधिक आव्हानात्मक प्रकारात यशाची अधिक शिखरे सर करेल, अशी आशाही आपण नक्कीच बाळगू शकतो.

इंग्लंडविरुद्धची मालिका अधिक आव्हानात्मक!

कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवणे, नेहमीच कठीण असते. परंतु भारताने सलग दुसऱ्यांदा हा पराक्रम करून दाखवला. त्यातही यंदा तर एकामागून एक प्रमुख खेळाडू जायबंदी होत असतानाही नव्या दमाच्या खेळाडूंना साथीला घेत कर्णधार अजिंक्य रहाणेने संघबांधणी केली आणि ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचे जितके कौतुक करावे तितके कमीच. परंतु आता भारताने इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. इंग्लंड त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंसह भारतात दाखल झाला असून त्यांनी नुकतीच श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत धूळ चारली आहे. त्याशिवाय भारतीय संघदेखील जवळपास दीड वर्षांने मायदेशात कसोटी सामना खेळणार आहे. विराट कोहली, इशांत शर्मा परतल्याने दोन्ही संघांमध्ये कडवी चुरस पाहायला मिळेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींसाठी ही मालिका मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

– लालचंद राजपूत, भारताचे माजी क्रिकेटपटू

सैजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 7:12 am

Web Title: indian cricket team keep the winning flag high krida dd70
Next Stories
1 भारताला नमवणे आव्हानात्मक!
2 १८ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी उसळणाऱ्या चेंडूंवर बंदी हास्यास्पद -वॉन
3 ऑलिम्पिकच्या चर्चेने खेळाडूंच्या तयारीला फटका
Just Now!
X