करोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरात सध्या दहशतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. भारताचे क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नुकतीच एका प्रसारमाध्यमाच्या फेसबुक पेजवर लाइव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला कोणता संघ आव्हान ठरू शकेल, याबाबत सांगितले.

‘विराट म्हणजे…’; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

“१९८५ सालचा भारताचा संघ हा अप्रतिम होता यात वादच नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो संघ कोणत्याही इतर संघाला आव्हान देऊ शकला असता. हा संघ वन डे आणि टी २० मध्ये दमदार कामगिरी करू शकतो. सध्या विराटच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीम इंडियासाठीही १९८५ चा आमचा संघ तगडं आव्हान ठरू शकला असता. मी तर असंही म्हणतो की १९८५ चा संघ हा १९८३ च्या विश्वविजेत्या संघापेक्षाही उत्तम होता. मी दोनही संघांमध्ये खेळलो आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातही मी होतो आणि १९८५ च्या संघातही मी होतो. जर तुम्ही दोन संघांची तुलना केलीत, तर दोनही संघात ८० टक्के खेळाडू सारखेच होते, पण ८५ च्या संघात शिवरामकृष्णन, सदानंद विश्वनाथ, अझरूद्दीन हे युवा खेळाडूही आले होते. त्यामुळे तो संघ अधिक चांगला झाला होता”, असे रवी शास्त्री यांनी सांगितले.

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

लॉकडाउनच्या परिस्थितीवर रवी शास्त्रींचं मत

“करोनामुळे ओढवलेली लॉकडाउनची परिस्थिती थोडीशी विचित्र आहे. जगभरातील देश शांत आहेत. दगडफेकीसारखे प्रकार घडत नाहीत. सगळी अत्याधुनिक शस्त्र पडून आहेत आणि संपूर्ण जग केवळ एका विषाणूमुळे ठप्प झालंय. माणूस आणि निसर्गाच्या संघर्षात हे वारंवार घडतंय, पण आयुष्यात शाश्वत असं काहीच नसतं. आपल्या सर्वांना घरी बसून राहण्यासाठी अशी गंभीर परिस्थिती निर्माण व्हावी लागली हे दुर्दैवी आहे. पण माझ्या मते, आयुष्यात काही गोष्टी अशाच कठीण पद्धतीने शिकायला मिळतात. यातून एक गोष्ट शिकायला मिळते की प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, तुम्हाला आता जे मिळतंय त्याबद्दल नेहमी ऋणी राहा आणि कोणतीही गोष्ट गृहित धरु नका”, असे मत रवी शास्त्रींनी व्यक्त केले.