निदाहास चषकाचा अंतिम सामना खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांची उत्कंठा वाढवणारा ठरला. अतिशय नाट्यमय वळणावर येऊन शेवट झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार ठरला. सातव्या क्रमांकावर येऊन आठ चेंडूंमध्ये २९ धावांची खेळी करणारा दिनेश क्रीडारसिकांच्या मनावर राज्य करुन गेला. पण, मुळात तो सातव्या स्थानावर खेळण्यासाठी येण्याऐवजी सहाव्या स्थानावर का आला नाही, हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करत होता. खुद्द कार्तिकसुद्धा रोहित शर्माच्या या निर्णयावर नाराज होता. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार याचा खुलासा खुद्द रोहितनेच माध्यमांशी संवाद साधताना केला.

अंतिम सामन्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना कार्तिकला एक स्थान पुढे म्हणजे सातव्या स्थानावर जाऊन खेळण्यास सांगितल्याने तोही नाराज असल्याचं त्याने स्पष्ट केलं. याविषयीच सांगत रोहित म्हणाला, ‘तुलाच सामना संपवायचा आहे. तुझ्या खेळाचं जे काही कौशल्य आहे, त्याची अखेरच्या तीन- चार षटकांमध्ये संघाला गरज लागणार आहे. त्यामुळे तू सातव्या स्थानावर खेळण्यास जा, असं मी त्याला सांगितलं होतं. तो हे करु शकत होता, त्यामुळेच त्याला १३ व्या षटकात सहाव्या स्थानावर खेळण्यासाठी पाठवलं नव्हतं. या निर्णयावर तो नाराज होता.’

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

सातव्या स्थानावर येण्याची नाराजी घेऊनच दिनेश कार्तिक मैदानात उतरला आणि त्याने अफलातून फटकेबाजी करत बांगलादेश संघाच्या हातातोंडाशी गेलेला निदाहास चषकाच्या अंतिम सामन्यातील विजय हिसकावून भारतीय संघाला सामना जिंकून दिला. आपल्या या खेळीमुळे त्याला आनंदच झाला असणार यात शंका नाही, असं म्हणत कार्तिकने आपला विश्वास सार्थ ठरवल्याची भावना रोहितने व्यक्त केली. त्याशिवाय येत्या काळात आपल्या खेळीमुळे खुद्द कार्तिकला प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.