ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतची तुलना महेंद्रसिंग धोनीसोबत केली जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विजयी भारतीय संघ आज मायदेशी परतला असून नवी दिल्लीत ऋषभ पंतने पत्रकारांशी संवाद साधला.

एरव्ही टीकेचा धनी झालेल्या ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात वगळण्यात आल्यानंतर ऋषभ पंतने मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देत आपली छाप सोडली. तिसऱ्या कसोटी सामन्यातही ऋषभ पंतने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियासमोर पराभवाचं सकट उभं केलं होतं. ऋषभ पंतने ९७ धावा केल्या होत्या.

आणखी वाचा- IND vs ENG: ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची मालिकेतून माघार

ब्रिस्बेनमधील सामन्यात ऋषभ पंत विजयाचा शिलेदार ठरला. दुखापतीतून सावरलेल्या ऋषभ पंतने शेवटच्या दिवशी ८९ धावा ठोकत भारताला विजय मिळवून दिला. पंतने केलेल्या विजय़ी खेळीची तुलना महेंद्रसिंग धोनी, गिलक्रिस्ट आणि मार्क बाऊचर यांच्यासोबत होत आहे. यावर पत्रकारांशी बोलताना ऋषभ पंतने प्रतिक्रिया दिली.

“धोनीसारख्या खेळाडूसोबत आपली तुलना होणं फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यासोबत तुलना झाल्याने खूप चांगलं वाटत आहे. पण माझी तुलना कोणासोबत व्हावी अशी इच्छा नाही. मला माझं नाव कमवायचं आहे. त्यावरच माझं संपूर्ण लक्ष आहे. कारण एका महान खेळाडूची तुलना नवख्या खेळाडूसोबत होणं योग्य नाही,” असं ऋषभ पंतने म्हटलं आहे.

Video: एकदम दणकाच… ऑस्ट्रेलियाला नमवणाऱ्या अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत

दरम्यान आयसीसी टेस्ट क्रमवारीत ऋषभ पंत १३ व्या क्रमांकावर पोहोचला असून यासंबंधी विचारण्यात आलं असता, चांगलं वाटतं पण मला त्याबद्दल फारसं माहिती नाही. भारतासाठी सामने जिंकणं एवढंच माझं काम आहे असं म्हटलं.