योगेश्वर दत्ता या अनुभवी खेळाडूने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर भारताच्या पदरी आलेली निराशा सुरूच राहिली. भारताच्या चारही महिलांचे जागतिक कुस्ती स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
महिलांमधील अनुभवी भारतीय खेळाडू गीता फोगटला ५८ किलो गटांत पदकाच्या फेरीत स्थान मिळवता आले नाही. तिला पहिल्या लढतीत जपानच्या काओरी इचोने १०-० असे सहज पराभूत केले. इचोने अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे गीताला रिपेज फेरीद्वारे कांस्यपदक मिळवण्याची संधी होती. मात्र तेथेही पराभवाने गीताची पाठ सोडली नाही. तेथेही तिला टर्कीची खेळाडू एलिफ जॅली येस्लिर्मिक हिने १०-० असे एकतर्फी लढतीत धूळ चारली.
गीताची सहकारी अनिता कुमारीने ६३ किलो गटात नादिला मुश्का सेमेन्तोसावावर ९-१ अशी मात केली व उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल केली. मात्र नंतर तिला कोलंबियाच्या सँड्रा विव्हियाना रोवाकडून २-५ असा चुरशीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. ललिता कुमारी व निक्की या अन्य भारतीय खेळाडूंना उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. ५५ किलो विभागात ललिताला अन्री किमुराने (जपान) ९-० असे निष्प्रभ केले. ७५ किलो गटात जपानच्याच चिआकी लिजिमाने त्याच फरकामे निक्कीचा पराभव केला.